
ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱयांनी संपाचा इशारा दिला आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या एसटी कष्टकरी जनसंघाचे कर्मचारी उद्या, सोमवारपासून संपावर जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मोठय़ा प्रमाणात हाल होण्याची शक्यता आहे.
सातव्या वेतन आयोगासह एसटी कर्मचाऱयांच्या विविध मागण्यांसाठी गुणरत्न सदावर्ते यांनी संपाची हाक दिली आहे. विविध जिह्यांतील एसटी कर्मचाऱयांशी याबाबत सदावर्ते यांनी बातचीत सुरू केली असून त्याबाबतची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱयांचा संप झाल्यास प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. दरम्यान, एसटी कर्मचाऱयांच्या संपाला इतर कामगार संघटनांनी विरोध दर्शविला आहे.
महाविकास आघाडी सरकार असताना सदावर्ते यांनी एसटीच्या विलीनीकरणाबाबत मोठे आंदोलन केले होते, मात्र विलीनीकरणाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे सरकारसोबत ज्यांचे साटेलोटे आहे त्यांनी विलीनीकरणाबाबत सरकार आणि महामंडळाला जाब विचारून कर्मचाऱयांचे प्रश्न सोडवावेत, उगाच स्टंटबाजी करू नये, अशा शब्दांत इतर कामगार संघटनांच्या नेत्यांनी नाव न घेता सदावर्ते यांना सुनावले आहे.


























































