
नवीन वर्षाच्या सुरुवातीला एसटीच्या तिकीट दरात 14.95 टक्क्यांची वाढ करणाऱ्या महायुती सरकारने आता कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या खिशावर डल्ला मारला आहे. गणेशोत्सवासाठी सुरू केलेल्या ग्रुप बुकिंगच्या तिकीट दरात तब्बल 30 टक्क्यांची भाडेवाढ केली आहे. एसटी महामंडळाने बुधवारी तसे परिपत्रक जारी केले. परिवहन विभागाच्या लुटमारीच्या या नव्या ‘प्रतापा’विरुद्ध गणेशभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
ग्रुप बुकिंगद्वारे एकेरी पद्धतीने एसटी बस आरक्षित करणाऱ्या प्रवाशांकडून मूळ प्रवास भाडय़ाच्या 30 टक्क्यांनी अधिक भाडे आकारणी करण्याचे निर्देश एसटी महामंडळाने राज्यातील सर्व विभागांना दिले आहे. ग्रुप बुकिंगद्वारे प्रवाशांना बस उपलब्ध करून देताना प्रामुख्याने प्रवासी बसण्याचे व उतरण्याचे ठिकाण यातील अंतरानुसार येणाऱ्या प्रवासभाडय़ाची प्रति प्रवासी आकारणी करून बसेस आरक्षित केल्या जातात. त्या बसेसद्वारे प्रवाशांना इच्छितस्थळी पोहोचवल्यानंतर परतीच्या प्रवासावेळी त्या मार्गावर प्रवासी उपलब्ध होत नाहीत. तसेच ठरावीक कालावधीत त्या मार्गावरून जास्त बसेस मार्गस्थ होत असल्यामुळे बहुतांशी बसेस रिकाम्या चालवाव्या लागतात. त्यामुळे महामंडळाचे आर्थिक नुकसान होते, असे कारण देत एसटी महामंडळाने गणेशोत्सवासाठी सुरू केलेल्या ग्रुप बुकिंगवर 30 टक्क्यांची भाडेवाढ लादली आहे. या भाडेवाढीवर गणेशभक्त तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.
सूट दिली 15 टक्क्यांची, लूट केली 30 टक्क्यांची!
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वी एसटीच्या लांब व मध्यम पल्ल्याच्या (150 किमीपेक्षा जास्त) प्रवासासाठी आगाऊ आरक्षणात 15 टक्क्यांची सूट लागू केली होती. मात्र त्याला काही दिवस उलटत नाही तोच ग्रुप बुकिंगच्या आडून दुप्पट म्हणजेच तब्बल 30 टक्क्यांची लूट सुरू केली आहे. यातून महायुती सरकारचा सवलतींचा खोटा दिखावा आणि लुटमारीचा अजेंडा उघड झाला आहे.
पंढरपूर वारीमध्येही भाडेवाढ लागू होणार
प्रवाशांचा एखादा गट (कमीत कमी 40 प्रवासी) एखाद्या ठिकाणाहून थेट दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणार असेल तर ग्रुप बुकिंगद्वारे आरक्षण दिले जाते. प्रवासी गणेशोत्सवाबरोबरच पंढरपूरच्या यात्रेसाठी मोठय़ा प्रमाणावर ग्रुप बुकिंग पद्धतीने एसटी बसगाडय़ा आरक्षित करतात. त्यामुळे गणेशभक्तांबरोबरच पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या भाविकांना ग्रुप बुकिंग करताना 30 टक्के भाडेवाढीची झळ बसणार आहे.