
दिवाळी तोंडावर आला असतानाही एसटी कर्मचाऱयांच्या विविध भत्त्यांसह दिवाळी बोनसचा पत्ता नसल्याने राज्यभरातील 83 हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. कर्मचाऱ्यांना केवळ ऑक्टोबरचे वेतन दिवाळीपूर्वी दिले जाणार आहे. त्यासाठीही आवश्यकतेपेक्षा कमी म्हणजेच 391 कोटी इतका निधी (प्रवासी सवलतींच्या प्रतिपूर्तीपोटी) सरकारने दिला आहे. त्यामुळे प्रलंबित रक्कम व मागण्यांसाठी कर्मचाऱयांची संयुक्त कृती समिती आंदोलनाच्या पवित्र्यावर ठाम आहे.
राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱया महाराष्ट्र एसटी कामगार सेनेसह 11 संघटनांच्या एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने 6 नोव्हेंबरपासून आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यानंतर कर्मचाऱयांचे ऑक्टोबरचे वेतन दिवाळीपूर्वी देण्याच्या अनुषंगाने सरकारने प्रवासी सवलतींच्या प्रतिपूर्तीपोटी 391.02 कोटींचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली. वास्तविक, सर्व कर्मचाऱयांच्या पूर्ण वेतनासाठी महिन्याला 450 ते 480 कोटींची आवश्यकता असते. ही पूर्ण रक्कम न मिळाल्यामुळे कर्मचायांना पीएफ, ग्रॅच्युईटी, एलआयसी, एसटी बँक व सोसायटी हप्ता आदी रकमेसाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे. ऐन दिवाळीतही पूर्ण पगार हाती पडणार नसल्याने कर्मचाऱयांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने आंदोलन करण्याचा पवित्रा कायम ठेवला आहे. त्यामुळे एसटी बससेवा दिवाळीत कोलमडण्याची चिन्हे आहेत.
महागाई भत्त्यात वाढ करण्याचा परिवहन मंत्र्यांनी शब्द पाळला नाही, प्रलंबित महागाई भत्त्याचा फरक, दिवाळी भेट यावर कोणताही निर्णय नाही. तरीही केवळ दिवाळीपूर्वी पगार मिळणार म्हणून कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड ही एसटी कामगारांची थट्टा आहे.
हिरेन रेडकर, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कामगार सेना
कर्मचाऱ्यांच्या असंतोषात वाढ
प्रवासी सेवेसाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना 31 ऑक्टोबरपूर्वी 25,000 रुपये ‘दिवाळी भेट’ म्हणून आणि 12,500 रुपये ‘दिवाळी अग्रीम’ म्हणून मिळतील, अशी आशा होती. मात्र त्याबाबत अवाक्षर न काढता ऑक्टोबरचे वेतन दिवाळीपूर्वी देण्याची कार्यवाही करून ‘शब्द पाळल्याचे’ सांगितले जात आहे. त्यावरून कर्मचाऱयांच्या असंतोषात वाढ झाली आहे.






























































