एसटी महामंडळातील सवलतींचे स्मार्ट कार्ड घेण्यासाठी मुदतवाढ: दिवाकर रावते

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

एसटी महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या विविध दर सवलतींसाठी स्मार्ट कार्ड घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, बऱ्याच सवलत धारकांनी (विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग इत्यादी) अद्याप स्मार्ट कार्ड घेतलेले नाही. सध्या शाळा, महाविद्यालये सुरु झाली असून स्मार्टकार्डअभावी विद्यार्थ्यांची तसेच ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग इत्यादी सवलत धारकांची गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे स्मार्ट कार्ड घेण्यास 1 जानेवारी 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे राज्याचे परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी शुक्रवारी जाहीर केले.

सध्या शाळा, महाविद्यालये सुरु झाल्याने स्मार्ट कार्ड घेण्यासाठी एसटी केंद्रांवर विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आदी सवलत धारकांचीही गर्दी होत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणातील सवलतधारकांना स्मार्टकार्डे देण्यासाठी जास्त वेळ लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थी तसेच इतर सवलतधारकांची गैरसोय टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना जुन्या पद्धतीच्या पासच्या आधारे तर इतर सवलत धारकांना ओळखपत्राच्या आधारे प्रवासाची सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला असून जुनीच पद्धती अवलंबण्यात येणार आहे.

राज्यातील एसटी महामंडळाच्या सर्व कार्यालयांना शुक्रवारी यासंदर्भात एसटी मुख्यालयातून सूचना देण्यात आल्या आहेत. 1 जानेवारी 2020 पासून मात्र सवलतीसाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य असेल. सर्व सवलत धारकांनी (विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग इत्यादी) 31 डिसेंबर 2019 अखेर संबंधित यंत्रणांकडे संपर्क साधून आपापली स्मार्टकार्डे काढून घ्यावीत, असे आवाहन रावते यांनी केले आहे. राज्यात सध्या सुमारे 35 लाख विद्यार्थी आणि साधारण 50 लाख ज्येष्ठ नागरिक विविध सवलतीचे लाभार्थी आहेत. याशिवाय स्वातंत्र्यसैनिक, दिव्यांग, पत्रकार, राज्य सरकारचे पुरस्कार विजेते, दुर्धर आजारग्रस्त आदींना एसटी महामंडळातर्फत सवलत देण्यात येते. या सर्वांना आता स्मार्ट कार्ड घेण्यासाठी 1 जानेवारी 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, सध्या ज्यांनी स्मार्ट कार्डे काढली आहेत. त्यांना स्मार्ट कार्डच्या आधारे प्रवास सवलत देण्यात येणार आहे.