
दुधाळ जनावरांच्या किमती मोठय़ा प्रमाणात वाढल्या असून चाऱयाचे दरही 10-15 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील तबेल्याच्या दुधाच्या दरात पाच रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मुंबई दूध उत्पादक संघाने घेतला आहे. त्यामुळे आतापर्यंत 80 रुपये लिटर दराने मिळणाऱया दुधासाठी आता 85 रुपये मोजावे लागणार आहेत. नवे दर 1 मार्चपासून लागू होणार आहे.
वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि परिसरातील दूध उत्पादकांची बैठक गुरुवारी जोगेश्वरी येथे पार पडली. यावेळी दुधाच्या विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुंबई दूध उत्पादक संघाचे संयोजक सी. के. सिंह यांनी दिली. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.