स्टॅलिनग्रॅड युद्धाचा नायक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रतीक राजूरकर

व्होल्गोग्रॅड शहराला स्टॅलिनचा सन्मान म्हणून स्टॅलिनग्रॅड नाव दिले गेले होते. म्हणूनच हे शहर ताब्यात घेण्यासाठी जर्मन सैन्याने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. दुसऱया महायुद्धातील सर्वात भीषण युद्ध म्हणून या युद्धाची इतिहासात नोंद आहे. स्टॅलिनग्रॅडचे युद्ध 1943 साली जर्मन सैन्याच्या दुसऱया महायुद्धातील पराभवाची सुरुवात ठरले, तर दुसरीकडे रशियाच्या लाल सैन्यातून वसिली झायत्सव (Vasily Zaytsev) या रशियन स्नायपरचा (नेमबाज) उदय झाला.

दुसऱ्या महायुद्धातील सर्वात भीषण व रक्तरंजित युद्ध म्हणून स्टॅलिनग्रॅडची इतिहासात नोंद आहे. 23 ऑगस्ट ते 2 फेब्रुवारी… पाच महिने एक आठवडा तीन दिवस हे युद्ध सुरू होते. व्होल्गोग्रॅड शहराला स्टॅलिनचा सन्मान म्हणून स्टॅलिनग्रॅड नाव दिले गेले होते. म्हणूनच हे शहर ताब्यात घेण्यासाठी जर्मन सैन्याने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. युद्धात जवळ जवळ 2 दशलक्ष लोक मृत्यू, जखमी अथवा युद्धबंदी ठरले. जर्मन सैन्य वायुदलाने शहरातील नागरी वस्त्यांत झडत्या व हवाई हल्ले करून प्रचंड नुकसान केले होते. मात्र स्टॅलिनग्रॅडचे युद्ध 1943 साली जर्मन सैन्याच्या दुसऱया महायुद्धातील पराभवाची सुरुवात ठरले, तर दुसरीकडे रशियाच्या लाल सैन्यातून वसिली झायत्सव (Vasily Zaytsev) या रशियन स्नायपरचा (नेमबाज) उदय झाला. पुढे रशियाचा नायक या पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात आले.

23 मार्च 1915 रोजी वसिलीचा एका शेतकरी कुटुंबात जन्म झाला. युरालच्या पर्वतीय प्रदेशात वसिलीचे बालपण गेले. आजोबांच्या समवेत वसिली युरालच्या बर्फाच्छादित पर्वतीय प्रदेशात लांडगे, हरिणांची शिकार करणे हा त्याचा छंद. वयाच्या बाराव्या वर्षी वसिलीने पहिल्या लांडग्याची शिकार केली. बंदुकीचे ओझे पेलण्यासाठी वसिलीचे खांदे अजून सक्षम झाले नव्हते, परंतु बंदूक चालवण्यासाठी त्याची बोटं आणि डोळे अचूक नेम साधायची. वयाच्या 22 व्या वर्षी वसिली रशियाच्या नौदलात रुजू झाला. दुसऱया महायुद्धात जर्मनीने रशियावर केलेल्या हल्ल्याने अनेक रशियन नागरिक स्वयंस्फूर्तीने सीमेवर जाण्यास सज्ज झाले.

22 सप्टेंबर 1942 वसिलीची स्टॅलिनग्रॅडच्या युद्धभूमीवर नेमणूक झाली. वसिलीचे स्वागत जर्मन वायुदल, नौदल व भूदलाने बॉम्बच्या वर्षावानेच केले. पुढे युद्धभूमीवर पराक्रम गाजवून वसिली परतला तेव्हा त्याचे स्वागत सर्वोच्च पुरस्कारांनी केले गेले. स्टॅलिनग्रॅडला पाय ठेवताच वसिलीने शत्रुसैन्याला बंदुकीवरील आपल्या बोटांची चुणूक दाखवली. ते बघून लाल सैन्यातील अधिकारी प्रभावित झाले. एक दिवस लाल सैन्यातील अधिकाऱयाने 800 मीटरवरील जर्मन सैन्य अधिकाऱयाला लक्ष्य करण्याचा वसिलीला आदेश दिला. खिडकीतून नेम साधत मोसिन नॅगंट (Mossin Nagant) रायफलीच्या एका गोळीतच जर्मन अधिकारी कोसळला. एकामागोमाग अजून काही जर्मन अधिकाऱयांना त्याने दूरवरून अचून टिपले. लाल सैन्याने त्याचा गौरव करून त्याला स्नायपर रायफलने अलंकृत केले.

इंग्रजीत ‘एहग्ज’ या शब्दाची नोंद ब्रिटिश इंडियात 1770 सालापासून आढळते. स्नाईप हा पक्ष्यांच्या शिकारीचा एक खेळ तेव्हा प्रचलित होता. इंग्रजीतील ‘एहग्ज’ या शब्दातून ‘एहग्ज’ (स्नायपर) शब्दाचा 1820 साली उगम झाला. ‘शार्प शूटर’ या शब्दाला अनुसरून हा शब्दप्रयोग प्रचलित झाला. शार्प शूटर कालांतराने अंडरवर्ल्डमुळे कुख्यात झाला. सैन्यातील स्नायपर हा आजही तितकाच प्रख्यात व प्रतिष्ठेचा आहे. आजही युद्धात स्नायपर यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून अनेक मोहिमांत त्यांची नियुक्ती महत्त्वाची ठरते. युद्ध चकमकीत नेम साधता येईल अशा उचित जागेवरून स्नायपर दूर अंतरावरून लक्ष्य जवळ करत असतात. चित्रपटांत अनेकदा हे दृश्य बघायला मिळते. जागतिक स्तरावर अनेक सैनिकी कारवाईत स्नायपरची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.
शत्रूंच्या वेढय़ातील स्टॅलिनग्रॅडच्या संरक्षणासाठी वसिली सज्ज झाला. शत्रूच्या नजरेस पडू नये म्हणून वसिली कधी उंचावर, कधी पाण्याच्या पाइपमध्ये, कधी पडक्या इमारतीच्या ढिगाऱयाखाली तासन्तास सावज टप्प्यात येण्याची वाट बघत बसायचा. सावज टप्प्यात येताच वसिलीच्या बंदुकीची गोळी शत्रूचा वेध घेऊन त्याला ठार करत असे. स्नायपर बंदुकीचा आवाज मोठा असल्याने वसिली एखादा बॉम्बच्या अथवा इतर आवाजाच्या आड गोळी झाडत असे, जेणेकरून कुणाला गोळी कुठल्या दिशेने आली याचा अंदाज येऊ नये. 10 नोव्हेंबर ते 17 डिसेंबर 1942 दरम्यान वसिलीच्या बंदुकीने ठार झालेले जर्मन सैन्यातील अधिकारी, सैनिक यांची संख्या 300 च्या वर असण्याची शक्यता आहे. वसिलीची रणनीती तिन्ही बाजूंना प्रत्येकी दोन सैनिक ठेवून घेराव घालण्याची असे. त्या व्यूहरचनेला ‘एहग्ज ’ संबोधले जाते. आजही ती पद्धती उपयोगात आणली जाते.

युद्ध शस्त्रावरच नाही तर मनोधैर्यावरसुद्धा लढले जाते. वसिलीच्या गोळ्यांनी अनेक जर्मन सैनिक अधिकारी ठार झाल्याने जर्मन सैन्याचे मानसिक खच्चीकरण होऊ लागले. वसिलीला मोठय़ा प्रमाणात दोन्ही गोटांत प्रसिद्धी मिळू लागली होती. जर्मन सैन्य वसिलीच्या अचानक येणाऱया गोळीच्या बातमीनेच घायाळ झाले होते. त्याला मारण्यासाठी जर्मनीने बर्लिन स्नायपर प्रशिक्षक एरविन या सुपरस्नायपरला स्टॅलिनग्रॅडला पाचारण केले. अत्यंत धूर्त व युद्धात निपुण असलेला एरविन व वसिलीचा अनेक दिवस लपंडाव सुरू होता. एक दिवस वसिलीला एरविनचा ठिकाणा कळताच तातडीने तो परिसर गाठला. वसिलीच्या सहकाऱयाने काठीने हेल्मेट वर केल्यावर लपलेल्या एरविने त्यावर गोळी झाडली. लपलेला एरविन वसिलीला गवसला होता. क्षणाचाही विलंब न लावता वसिलीने एरविनच्या दिशेने गोळी झाडून ठार केले. वसिलीच्या शिकारीला आलेला एरविन स्वतःच शिकार होऊन बसला. बातमी युद्धभूमीवर बंदुकीतील गोळीच्या वेगाने सुटली. जर्मन सैन्याच्या गोटात प्रचंड नैराश्य पसरले. तिथून जर्मन सैन्याच्या स्टॅलिनग्रॅडमधील पराभवाला सुरुवात झाली. पुढे वसिली स्टॅलिनग्रॅड युद्धात जखमी झाला व त्याच्या एक डोळ्याला गंभीर दुखापत झाली. मॉस्को येथे वसिलीवर यशस्वी शस्त्र्ाक्रिया झाली. वसिलीच्या अनुपस्थितीत त्याने प्रशिक्षित केलेल्या स्नायपरांनी सहा हजारांच्या वर जर्मन सैनिकांना ठार केले. 2 फेब्रुवारी 1943 रोजी स्टॅलिनग्रॅडच्या युद्धात रशियाचे लाल सैन्य विजयी ठरले. हा विजय सैन्याच्या एकत्रित प्रयत्नांतला असला तरी वसिली त्याचा नायक ठरला. ‘रशियाचा नायक’ या पुरस्काराने वसिलीला पुढे गौरविण्यात आले.

[email protected]