
स्वातंत्र्यानंतर किंवा फाळणीवेळी किंवा 1962 च्या हिंदुस्थान-चीन युद्धानंतर हिंदुस्थानातून पाकिस्तान व अन्य देशांमध्ये स्थलांतर केलेल्या लोकांच्या मालमत्ता हिंदुस्थानी कायद्यानुसार ‘शत्रू मालमत्ता’ म्हणून गणल्या जातात. त्यांच्या खरेदी-विक्री व्यवहारांवरील स्टॅम्प डय़ुटी माफ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. शत्रू मालमत्ता केंद्र आणि राज्य सरकारांच्या ताब्यात आहेत. मुद्रांक शुल्कांमुळेच लिलावावेळी या मालमत्ता खरेदी करण्यासाठी प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे शुल्क माफीचा निर्णय घेतला गेला.
मुंबईतील मालमत्तांवर अदानींचा डोळा?
राज्यात एकूण 428 शत्रू मालमत्ता आहेत. त्यातील सर्वाधिक मालमत्ता मुंबई शहर – 62 आणि मुंबई उपनगर – 177 येथे आहेत. ठाणे – 86, पालघर – 77, रत्नागिरी – 11, नागपूर – 6, पुणे – 4, छत्रपती संभाजीनगर – 2, जालना – 2 तर सिंधुदुर्ग जिह्यात 1 शत्रू मालमत्ता आहे. मुंबईत त्यातील सर्वाधिक 239 मालमत्ता असून त्या जागांवर अदानी समूहाचाही डोळा असून त्यांच्यासाठीच मुद्रांक शुल्क माफ तर केला नाही ना, अशी चर्चा आहे.

























































