
कोरोनानंतर राज्याच्या अर्थव्यवस्थेने गती घेण्यास सुरुवात केल्यानंतर आता परदेशी कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास मोठय़ा प्रमाणावर उत्सुक असल्याचे दिसून आले आहे. राज्यातील ऊर्जेचा प्रश्न मिटवण्यासाठी 50 हजार कोटी रुपयांचा वीजनिर्मितीचा करार करण्यात आला आहे. सौर ऊर्जेला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याशिवाय पाण्याचा पुनर्वापर करून जल विद्युतनिर्मिती करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.
स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक परिषदेत जगातील ख्यातनाम कंपन्या सहभागी झाल्या होत्या. यानिमित्ताने देशातील पाच राज्यांची उद्योग दालने होती, त्यात महाराष्ट्राच्या दालनाचा प्रामुख्याने समावेश होता. या परिषदेत राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई सहभागी झाले होते. या परिषदेच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याने विविध पंपन्यांशी करार केले. या कराराच्या संदर्भात सुभाष देसाई यांनी अधिक माहिती दिली.
महाराष्ट्रात 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय रिन्यू पॉवर कंपनीने घेतला आहे. या कंपनीच्या माध्यमातून सौर ऊर्जेची निर्मिती करण्यात येणार आहे. त्याशिवाय जल विद्युतनिर्मितीमध्ये अनोखा प्रयोग राबवण्यात येणार आहे. जल विद्युतनिर्मिती करताना पाण्याचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. रात्री 10 च्यानंतर विजेची मागणी कमी होते तेव्हा वीजनिर्मिती होत नाही. वीजनिर्मिती करताना सोडलेले पाणी यावेळेत पंपाने वरती खेचले जाते. जगात अशा तंत्रज्ञानाचा वापर अनेक ठिकाणी सुरू झाला आहे. यासंदर्भात राज्याच्या ऊर्जा विभागाचा करार झाला आहे. यामुळे राज्यातील अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राला गती मिळणार आहे.
दावोसमध्ये राज्य सरकारने जागतिक कीर्तीच्या 24 आघाडीच्या कंपन्यांसोबत करार सुमारे 80 हजार कोटी रुपयांचा केला आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून किमान एक लाख रोजगारनिर्मिती होईल.
– सुभाष देसाई
महापालिकेत ऑनलाइन शिक्षण
‘बैजूस’ या ऑनलाइन शिक्षण देणाऱ्या कंपनीसोबतही करार झाला आहे. ही कंपनी मुंबई महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना विनामूल्य अभ्यासक्रम देणार आहे. या कंपनीसोबत करार झाला आहे. यावेळी कंपनीचे प्रमुख बैजू रविंद्रन उपस्थित होते.
ग्रामीण भागात उद्योग
राज्यातील ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, यवतमाळ, सोलापूर, नंदुरबार अशा जिल्ह्यांमध्ये उद्योग स्थापन होणार असल्याची माहिती सुभाष देसाई यांनी दिली. वस्त्रोद्योग, अन्नप्रक्रिया उद्योग, इंजिनीयरिंग, विज्ञान व तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रातील उद्योगांशी करार झाले आहेत. या कंपन्यांशी करार करण्यापूर्वी त्यांचे उद्देश तपासून पाहिले आहेत. या कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी गांभीर्यपूर्ण स्वारस्य दाखवले आहे.



























































