राज्य सहकारी बँकेची 61 हजार कोटींची उलाढाल, आर्थिक वर्षात 651 कोटींचा निव्वळ नफा

राज्य सहकारी बँकेची 61 हजार कोटी रुपयांची विक्रमी उलाढाल झाली आहे. या आर्थिक वर्षात बँकेला 651 कोटी रुपयांचा विक्रमी निव्वळ नफा प्राप्त झाला आहे. बँकेचे नेटवर्थ 5 हजार 300 कोटी रुपये इतके झाले असून पाच हजार कोटींच्या वर नेटवर्थ असलेली राज्य बँक ही देशातील एकमेव सहकारी बँक ठरली आहे.

बँकेच्या या आर्थिक सक्षमतेच्या निकषांवर ग्रामीण त्रिस्तरीय पतरचनेतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका या दुवा असल्याने ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आर्थिक अडचणीत आहेत, अशापैकी नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर राज्य बँकेस संस्थात्मक प्रशासक म्हणून राज्य शासनाने नवीन जबाबदारी दिली असून ती राज्य बँकेने स्वीकारली आहे. तसेच नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरही संस्थात्मक सल्लागार म्हणून राज्य बँकेने नवीन जबाबदारी स्वीकारली आहे. यापूर्वी अडचणीत असलेल्या बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस राज्य बँकेने 300 कोटी रुपयांचे अल्प व्याजदराने कर्ज मंजूर केले आहे. रिझर्व्ह बँकेने 17 फेब्रुवारी 2025 रोजीच्या पत्रान्वये राज्य बँकेस 500 कोटींचे दीर्घ मुदतीचे कर्जरोखे वितरीत करण्यास परवानगी दिलेली आहे. शेतकऱ्यांना अल्पवेळेत कर्ज मिळावे या उद्देशाने वखार महामंडळासोबत करार करून शेतकऱ्यांना वखार महामंडळाच्या गोदामात ठेवलेल्या पावतीच्या तारणावर ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे कर्ज पुरवठा करण्यात येतो. आतापर्यंत  205 कोटी रुपयांचे इतके कर्जवाटप या योजनेद्वारे केले आहे.

 राज्य बँकेला सलग चार वर्षांत अनुक्रमे 603 कोटी, 609 कोटी, 615 कोटी आणि या आर्थिक वर्षात 651 कोटी रुपये असा विक्रमी निव्वळ नफा प्राप्त झाला आहे. – विद्याधर अनास्कर, प्रशासक