राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहणार

39

सामना ऑनलाईन, मुंबई

सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने मंगळवारपासून पुकारलेला राज्यव्यापी संप सुरूच राहणार आहे. आम्ही चर्चेला तयार आहोत. परंतु सरकारकडूनच चर्चेसाठी कोणताही प्रस्ताव न आल्यामुळे पुढचे दोन दिवस संप सुरूच राहील अशी घोषणा कर्मचारी संघटनेने केली. या संपाचा फटका मंत्रालयापासून विविध सरकारी कार्यालयांमधील कामजाला बसला.

राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने ७, ८ आणि ९ ऑगस्ट रोजी संप पुकारण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार मंगळवारपासून सुरू झालेल्या संपात प्रामुख्याने तृतीय आणि चतुर्थश्रेणी कर्मचारी सहभागी झाले. याशिवाय शिक्षकेतर कर्मचारी संघटनाही सहभागी झाल्या. हा संप १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख आणि सरचिटणीस अविनाश दौंड यांनी केला.

सरकारची मेस्मा लावण्याची तयारी

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात होऊ शकली नाही. ही बैठक सह्याद्री अतिथीगृहावर घ्यावी लागली. दरम्यान, संपावरील कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे. मंत्रालय वगळता उर्वरित शासकीय कार्यालयांमध्ये ३७ टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. त्यामुळे संपाचा परिणाम झाला नसल्याचा दावा सरकारने केला.

मंत्रालयात शुकशुकाट

सकाळी मंत्र्यांची दालने तसेच ऑफिस उघडण्यासाठी कर्मचारीच आले नाहीत. अधिकारी वर्ग सकाळी साडेनऊच्या सुमारास नेहमीप्रमाणे कामावर आले. पण, ऑफिस उघडण्यासाठी कर्मचारीच आले नाहीत. अखेर अधिकाऱ्यांनी स्वतŠ विनंती केल्यानंतर चतुर्थश्रेणी कामगारांनी चाव्या आणून कार्यालये उघडली. त्यानतंर अधिकारी वर्गाने कार्यालयात प्रवेश केला. कँटीनमध्येही कर्मचारी न आल्यामुळे मंत्र्यांना दिवसभरात चहा मिळाला नाही. आमदार निवासातही मोठी गैरसोय झाली.

गावी जाण्याशिवाय पर्याय नाही

जळगावमधील गिरड या गावातील मंगला धनगर सकाळीच उपचारांसाठी जे. जे. रुग्णालयात आले. त्यांच्यासोबत त्यांचे पती सुभाष धनगरही होते. मंगला यांच्यावर मागील एका वर्षापासून जे. जे. रुग्णालयात पाठीच्या दुखण्यावर उपचार सुरू आहेत. दुपारी ओपीडीची वेळ टळून गेल्यामुळे थेट शुक्रवारी मुंबईत येण्यासाठी त्यांना सांगण्यात आले. पण मुंबईत घर नसल्यामुळे आता आम्हाला पुन्हा गावी जाण्याशिवाय पर्यात नाही असे धनगर दांपत्य डोळय़ांत पाणी आणून सांगत होते.

गावी जाण्यासाठी पैसे नाहीत

नगरच्या सुरेखा तिटकरे यांच्यावर न्यूरॉलाजी विभागात पुढील उपचार होणार आहेत, पण संपामुळे त्यांनाही शुक्रवारी येण्यास सांगितले. पण आता पुन्हा गावी जाण्याचा खर्च आम्हाला परवडणार नाही, असे सुरेखाच्या कुटुंबीयांनी सांगितले.

मंत्रालयापासून सरकारी रुग्णालये, डेअरी, जीएसटी कार्यालय, मुद्रांक शुल्क, नोंदणी कार्यालय, आरटीओ तसेच जिल्हाधिकारी कार्यालये, मत्स्य व्यवसाय विभाग, मुंबई पोलीस आयुक्त, शासकीय दुग्धशाळा, शिधावाटप कार्यालये या कार्यालयांतील कामकाज विस्कळीत झाले.

 साडेबावीस हजार शिक्षकेतर कर्मचारीही संपात सहभागी झाल्याने अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेवर परिणाम झाला.

 जे. जे. रुग्णालयात दिवसभरात फक्त २६ शस्त्रक्रिया झाल्या. तर ओपीडीमध्ये सुमारे तीन हजार रुग्णांची तपासणी झाली.

उपचारांसाठी व्याजाने पैसे घेतले

नांदेडमधील माणिक बनसोडे यांचे दोन्ही पाय रेल्वे अपघातात कापले गेले. प्लॅस्टिक सर्जरी करण्यासाठी ते मुंबईत आले होते. पण संपामुळे त्यांना घरी जाण्यास सांगितले. उपचारांसाठी व्याजाने पैसे घेतल्याचे बनसोडे यांनी सांगितले.

 

आपली प्रतिक्रिया द्या