शिक्षकांच्या गणित, विज्ञानाचा स्तर उंचावणार; ब्रिटिश कौन्सिलसोबत शिक्षण विभागाचा उपक्रम

राज्यातील शिक्षकांचा गणित आणि विज्ञानाचा स्तर उंचावण्यासाठी शालेय शिक्षण विभाग ब्रिटिश कौन्सिलसोबत विशेष उपक्रम सुरू करीत आहेत.

राज्यातील सरकारी शाळांमधील शिक्षकांना उत्तम इंग्रजी बोलता यावे, शिकवता यावे या उद्देशाने राज्य सरकारने 2012 मध्ये ब्रिटिश कौन्सिलसोबत करार केला होता. याद्वारे मागील दहा वर्षांत सुमारे दोन हजार मास्टर ट्रेनर तयार झाले असून एक लाख 46 हजार शिक्षकांना या प्रशिक्षणाचा लाभ मिळाला आहे. तर याचा फायदा 43 लाख 80 हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचला आहे. या उपक्रमाच्या यशानंतर आता गणित आणि विज्ञानाचे शिक्षणही विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे मिळावे या उद्देशाने येत्या काळात ब्रिटिश कौन्सिलशी करार करण्यात येणार आहे.

राज्यातील सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन दर्जामध्ये व शिक्षणाच्या दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून ब्रिटिश कौन्सिलने सादर केलेल्या परिणाम अहवाल पाहताना आनंद होत असल्याचे शालेय शिक्षणमत्री वर्षा गायकवाड यांनी यावेळी सांगितले. राज्यातील अभ्यासक्रम अधिक सक्षम व्हावा या उद्देशाने आयबी, केंब्रिजसारख्या अभ्यास मंडळांशी चर्चा करून आपल्या पाठ्यक्रमात काय बदल करता येतील या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत असल्याचे राज्याचे शिक्षण संचालक विशाल सोलंकी यांनी सांगितले.