आश्रमशाळांसाठी महानंदचे दूध; सरकारची तारीख पे तारीख

14

सामना प्रतिनिधी, मुंबई

आश्रमशाळामधील मुलांना सकस आहार म्हणून टेट्रापॅकिंगचे दूध पुरवण्याचा निर्णय आदिवासी विभागाने घेतला आहे. हे दूध महानंद डेअरीकडून खरेदी करण्याबाबत सरकारने हिरवा कंदील दाखवल्याने त्यांचे राज्यभर वितरणासाठी डेअरीने वितरकांचीही नियुक्ती केली आहे. मात्र दूध खरेदीबाबतचा अंतिम निर्णय घेण्यासाठी आदिवासी विभागाकडे वेळच नसल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत दोन वेळा सरकारकडून अधिकृतरीत्या बैठका लावल्या होत्या, मात्र ऐनवेळी वेळ नसल्याचे सांगत बैठका रद्द करून पुढील तारीख लवकरच कळवू असे सांगितले जात आहे. सरकारच्या या तारीख पे तारीख कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

राज्यातील 528 आश्रमशाळांमधील 1 लाख 87 हजार मुलांना सकस आहारांतर्गत दररोज सुमारे 45 हजार लिटर महानंदचे टेट्रापॅकिंग दूध पुरवण्याबाबत आदिवासी विभागाने डेअरीकडे पाच महिन्यांपूर्वी विचारणा केली होती. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत डेअरीने सुमारे 58 रुपये प्रतिलिटर दराने दुधाचा राज्यभर पुरवठा करण्यासाठी वितरकांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार डेअरीच्या शिष्टमंडळाने पावसाळी अधिवेशनादरम्यान आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांची भेट घेऊन आपला प्रस्ताव दिला होता. तेव्हा दूध खरेदीबाबत बैठक घेऊन अंतिम निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यानुसार 7 ऑगस्ट रोजी सावरा यांच्याकडे बैठक लावली होती. ती अचानक रद्द करून 20 ऑगस्टला बैठक लावली. तीही ऐनवेळी रद्द केल्याने सरकारला महानंदचे दूध घ्यायचे आहे की नाही याबाबत डेअरीमध्ये संशयाचे वातावरण आहे.

सरकारने दूध खरेदी करून डेअरीला आधार द्यावा
शेतकऱयांना दुधाचा वाढीव दर द्यावा लागत असल्याने महानंदला महिन्याला साडेचार कोटी रुपयांचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे हा आर्थिक भार हलका करण्यासाठी आम्ही कायदेशीर चौकटीत राहून आश्रमशाळांना दुधाचा पुरवठा करण्यास उत्सुक आहोत, पण त्याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याबाबत सरकारकडून वेळकाढूपणा सुरू आहे. उशिरा का होईना, पण सरकारने महांनदचे दूध खरेदी करून डेअरीला आधार द्यावा, अशी मागणी उपाध्यक्ष डी. के. पवार यांनी केली आहे.

summary-state govt delayed final approval for mahanand milk for ashram shala

आपली प्रतिक्रिया द्या