सरकारी कर्मचार्‍यांना दिवाळीपूर्वी पगार, 17 लाख कर्मचार्‍यांची दिवाळी गोड

1203

राज्य सरकारी कर्मचार्‍यांना दिवाळीपूर्वी वेतन देण्याचा निर्णय अखेर राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे राज्यातल्या सुमारे 17 लाख सरकारी कर्मचार्‍यांची व त्यांच्या कुटुंबीयांची दिवाळी गोड जाणार आहे.

राज्य सरकारी कर्मचार्‍यांना ऑक्टोबर महिन्याचा पगार दिवाळीपूर्वी देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला होता. राज्य सरकारने 9 ऑक्टोबर रोजी परिपत्रक काढून दिवाळीच्या आधी पगार देण्याचे आदेश सर्व विभागांना दिले होते. मात्र कर्मचार्‍यांचा पगार देण्यासाठी आवश्यक असलेले कोषागार विभागातील कर्मचारी विधानसभा निवडणुकीच्या कामात गुंतले असल्याने दिवाळीपूर्वी पगार देण्याचा निर्णय 11 ऑक्टोबर रोजी स्थगित केला. त्यामुळे सरकारी कर्मचार्‍यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली होती.

पण निवडणुकीच्या तोंडावर 17 लाख राज्य सरकारी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांची नाराजी नको म्हणून मुख्य निवडणूक आयुक्त बलदेव सिंह यांच्या उपस्थितीत मुख्य सचिव अजोय मेहता व सरकारी कर्मचार्‍यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. सरकारी कर्मचार्‍यांना दिवाळीपूर्वी ऑक्टोबर महिन्यातच वेतन देण्याची मागणी ठामपणे करण्यात आली होती. अखेर कोषागार कर्मचार्‍यांना निवडणुकीच्या कामातून मोकळे करण्याचे आश्वासन निवडणूक आयुक्तांनी दिले. त्यानंतर राज्याच्या वित्त विभागाने शासन परिपत्रक जारी केले आणि ऑक्टोबर महिन्याचे वेतन तसेच निवृत्तीवेतनही दिवाळीपूर्वी देण्याचे आदेश सर्व विभागांना दिले.

आपली प्रतिक्रिया द्या