गर्दी रोखण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तातडीने बंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परप्रांतीयांनी यूपी-बिहारच्या मेल-एक्स्प्रेसना प्रचंड गर्दी केल्याचे गेल्या वर्षीचे व्हिडीओ समाजमाध्यमांमध्ये पसरविले जात असल्याने रेल्वेने आता अशा अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच रेल्वे टर्मिनसवरील गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेने आता सीएसएमटी, एलटीटी, दादर आणि ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अलीकडेच या प्लॅटफॉर्म तिकिटाच्या किमतीमध्ये थेट दहा रुपयांवरून पाच पटीने वाढ करीत त्याची किंमत 50 रुपये करण्यात आली होती.

उन्हाळ्याच्या सुट्टय़ांमध्ये यूपी तसेच बिहारला जाणाऱया प्रवाशांची संख्या वाढत असते. मात्र, महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर या गोष्टीला जोडले जाऊन गेल्या वर्षीचे गर्दीचे व्हिडीओ समाजमाध्यमांमध्ये पसरविले जात आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये विनाकारण घबराट पसरली जात आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने सध्या रेल्वे उत्तरेकडे सोडत असलेल्या गाडय़ा हे रेल्वेचे वेळापत्रक पूर्ववत करण्याचा भाग असल्याचा म्हटले जात आहे. आज मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांनी वेबिनार घेऊन अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन प्रवाशांना केले आहे.

कोरोना रोखण्यासाठी तातडीने निर्णय

लांब पल्ल्यांच्या गाडय़ांसाठी स्थानकांवर गर्दी होऊ नये तसेच कोविड-19चा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने रेल्वे प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, ठाणे, दादर आणि पनवेल या स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री बंद करण्याचा निर्णय तातडीने घेतला गेला आहे.