महाराष्ट्र, गुजरातला 3 जूनला वादळ धडकण्याची शक्यता; हवामान खात्याचा इशारा

5975

अम्फान चक्रीवादळाने ओदिशा आणि पश्चिम बंगालला तडाखा दिल्यानंतर आता हवामान खात्याने महाराष्ट्र आणि गुजरातला वादळाचा इशारा दिला आहे. अरबी समुद्रात येत्या 48 तासात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार असल्याने या दोन राज्यांना 3 जूनपर्यंत वादळ धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

अरबी समुद्रात वातावरणात बदल झाल्याने दोन वादळे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यातील एका वादळाची दिशा आफ्रिकेच्या किनारपट्टीकडे आहे. हे वादळ ओमान आणि येमेनकडे वळेल. तर दुसरे वादळ हिंदुस्थानच्या समुद्रकिनाऱ्याजवळ तयार होत असून हे वादळ 3 जूनला महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. अरबी समुद्राच्या आग्नेय पूर्वमध्य भागात येत्या 48 तासात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. तसेच 48 तासात त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्याची तीव्रता वाढल्यावर त्याचे वादळात रुपांतर होऊन ते वादळ गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात 10 दिवसांपूर्वी निर्माण झालेल्या अम्फान चक्रीवादळाने पश्चिम बंगाल आणि ओदिशामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. या वादळामुळे 86 जणांचा बळी गेला होता. तर मोठ्या प्रमाणात वित्तहानीही झाली होती. तसेच लाखो लोक बेघर झाले होते. त्यानंतर आता महाराष्ट्र आणि गुजरातला हवामान खात्याने वादळाचा इशारा दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या