फिरकीविरुद्ध यशाची गुरुकिल्ली बचावातच, दीर्घकालीन क्रिकेटसाठी बचावाचे तंत्र भक्कम करा – दिलीप वेंगसरकर

दीर्घकाळ चालणाऱया क्रिकेट फॉरमॅटमध्ये हिंदुस्थानी फलंदाजांनी सातत्याने यश मिळवायचे असेल तर त्यांच्या बचावाच्या तंत्रात सुधारणा करणे अत्यावश्यक आहे, असे मत हिंदुस्थानचे माजी कर्णधार आणि राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले.

विकेटवर चेंडू वळायला लागल्यानंतर नेमके काय करायचे, याची स्पष्टता अनेक फलंदाजांकडे नसते. तसेच फिरकी गोलंदाजी खेळण्यासाठी आवश्यक असलेले पदलालित्य आणि संयमाचा अभाव दिसतो. त्यामुळे फलंदाज बचावाऐवजी आक्रमणावर भर देतात. आक्रमण करणे सोपे असते, मात्र फिरकी गोलंदाजीविरुद्ध खऱया अर्थाने यशस्वी व्हायचे असेल तर बचाव भक्कम असायलाच हवा, असे वेंगसरकर यांनी सांगितले.

चर्चगेट येथील ओव्हल मैदानावर आपल्या अकादमीच्या मैदानावर झालेल्या 14 वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी मुंबईच्या 14 वर्षांखालील मुलांच्या निवड समितीचे अध्यक्ष श्रीधर मांडले आणि मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान खात्याचे निरीक्षक जितेंद्र परदेशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

तत्पूर्वी झालेल्या अंतिम सामन्यात श्री माँ विद्यालय संघाने ब्रावो क्रिकेट अकादमीवर 6 विकेट्सनी मात करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. प्रथम फलंदाजी करणाऱया ब्रावो क्रिकेट अकादमी संघाला 40 षटकांच्या या सामन्यात 35 षटकांत 127 धावांत सर्वबाद व्हावे लागले.

धियान बराई (29) आणि भावयम (35) यांनी 50 धावांची सलामी दिल्यानंतर शौर्य काटे (नाबाद 31) आणि देवांश दळवी (11) यांचा अपवाद वगळता इतर फलंदाज अपयशी ठरले. प्रतिस्पर्धी संघाकडून युवान जैनने टिच्चून गोलंदाजी करत 18 धावांत 3 विकेट टिपल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना श्री माँ विद्यालय संघाची सुरुवात अडखळती झाली आणि संघाची अवस्था 3  बाद 19 धावा अशी झाली होती. मात्र आरव सिंगने विवान मांजरेकरच्या (14) साथीने चौथ्या विकेटसाठी 68 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. त्यानंतर कनिष्क साळुंखे (नाबाद 28) याच्या साथीने पाचव्या विकेटसाठी 42 धावांची अभेद्य भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला.

सबपुछ आरव सिंगच

आरव सिंगने केवळ 48 चेंडूंत नाबाद 53 धावा करताना 10 चौकार ठोकले आणि अंतिम सामन्यावर आपली छाप उमटवली. अंतिम सामन्यातील सामनावीर, स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज तसेच सर्वोत्तम खेळाडू (स्पर्धेत एपूण 191 धावा) म्हणून आरव सिंगलाच गौरविण्यात आले. सर्वोत्तम गोलंदाज म्हणून देवांश दळवी (9 विकेट्स) तर सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून दर्श मातले (दोघेही ब्रावो क्रिकेट अकादमीचे) यांची निवड करण्यात आली. विजेत्या आणि उपविजेत्या संघांना दिलीप वेंगसरकर, श्रीधर मांडले आणि जितेंद्र परदेशी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

संक्षिप्त धावफलक

ब्रावो क्रिकेट अकादमी – 35 षटकांत सर्वबाद 127 (धियान बराई 29, भावयम 35, शौर्य काटे नाबाद 31; युवान जैन 18 धावांत 3 विकेट) पराभूत वि. श्री माँ विद्यालय ः 24.2 षटकांत 4 विकेट्स 129 (आरव सिंग नाबाद 53, कनिष्क साळुंखे नाबाद 28).