दवाखाने बंद ठेवाल तर कारवाई करणार, महापालिकेचा खासगी डॉक्टरांना इशारा

497

कोरोना व्हायरसच्या पाठोपाठ सारीच्या आजाराने देखील डोके वर काढले आहे. त्यामुळे शहरात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पाश्वर्भूमीवर खासगी प्रॅक्टीस करणार्‍या डॉक्टरांनी आपले दवाखाने सुरु ठेवावेत, दवाखान्यात आलेल्या रुग्णाची तपासणी करावी. कोरोना व्हायसर किंवा सारीचे संशयित रुग्ण आढळल्यास त्याची माहिती महापालिकेला द्यावी. दवाखाने बंद ठेवले तर मनपाकडून कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

कोरोना व्हायरसच्या आजारामुळे आरोग्य सेवेतील शासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. शासकीय सेवेतील सर्वच डॉक्टर विविध जबाबदार्‍यांमध्ये दबून गेले आहेत. कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जारी केले आहे. त्यामुळे मुख्य बाजारपेठा बंद आहेत. त्याचा फायदा घेवून खासगी प्रँक्टीस करणार्‍या डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवू नयेत अशा आशयाचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पत्र सोबत जोडून महापालिकेने नोंदणीकृत दवाखान्यांना पत्र लिहून इशारा दिला आहे. महापालिकेकडे 465 दवाखान्यांची नोंदणी आहे. या सर्व दवाखान्याच्या प्रमुख डॉक्टरांना पत्र पाठवून दवाखाने सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दवाखाने बंद असतील तर कारवाई करु असा इशारा देखील देण्यात आला आहे अशी माहिती डॉ. अर्चना राणे यांनी दिली. खासगी डॉक्टरांनी कोरोना व्हायरसचा किंवा सारीचा संशयित रुग्ण आढळल्यास त्याची माहिती महापालिका व जिल्हा रुग्णालयाला देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या