औंधसह 16 गावांच्या शेती पाणीप्रश्नी मागील आठ दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय जगदाळे यांचे आमरण उपोषण सुरू आहे. याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने आज औंधसह सोळा गावांत कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच औंध येथे मोर्चा काढून शासनाचा निषेध करण्यात आला.
औंध गावातून भव्य निषेध रॅली काढण्यात आली. शासनाच्या मनमानी व वेळकाढूपणाबद्दल शेतकरी ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी ‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचं’, या घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी मोठय़ा संख्येने ग्रामस्थ, शेतकरी युवक, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
उपोषणकर्ते दत्तात्रय जगदाळे म्हणाले, शासनाने या योजनेस त्वरित प्रशासकीय मान्यता द्यावी तसेच आचारसंहितेअगोदर योग्य ती कारवाई व्हावी, मागील 13 वर्षांपासून आपण हा संघर्ष सुरू ठेवला आहे. शासनाने सोळा गावांतील जनतेचा अंत पाहू नये तसेच शासन जोपर्यंत योग्य न्याय देत नाही, तोपर्यंत आपण मागे हटणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
माजी उपसरपंच दीपक नलवडे म्हणाले, शासनाने शेती पाणीयोजनेबाबत गांभीर्याने विचार न केल्यास यापुढील काळात 16 गावे वेगळ्या प्रकारचे आंदोलन करून शासनास धडा शिकवेल.
दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा उरमोडी विभागाचे उपअभियंता अविनाश जाधव यांनी उपोषणस्थळी भेट देऊन दत्तात्रय जगदाळे यांच्याशी चर्चा केली. यावेळी प्रशांत जाधव, वसंत पवार, प्रशांत कुंभार, सर्जेराव जाधव उपस्थित होते.
दत्तात्रय जगदाळे यांचे उपोषण आठव्या दिवशीही सुरू होते. शनिवारी जगदाळे यांची तब्येत खालावली. यावेळी वैद्यकीय अधिकाऱयांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली.