स्वस्तात मस्त! विद्यार्थ्याने दोन लाखांत बनवली इलेक्ट्रिक कार 

प्रदूषणाची समस्या आणि पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे नागरिक आता स्वस्तात मस्त पर्याय म्हणून इलेक्ट्रिक गाडय़ांकडे वळत आहेत, मात्र सध्या तरी इलेक्ट्रिक गाडय़ांची किंमत सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी नाही. मध्य प्रदेशातील एका विद्यार्थ्याने अनोखा जुगाड करत इलेक्ट्रिक कार बनवली आहे. ही कार एका चार्जिंगमध्ये 185 कि.मी. अंतर धावणार आहे. तीन ते चार तासांत गाडीची बॅटरी फुल चार्ज होते. त्यासाठी केवळ 30 रुपयांचा खर्च येणार आहे. अवघ्या दोन लाख रुपयांत कारनिर्मिती केल्याचा दावा विद्यार्थ्याने केला आहे.

मध्य प्रदेशातील मकरोनिया येथे राहणाऱया आणि गांधीनगर येथील एका इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शिकणाऱया हिमांशू पटेल या विद्यार्थ्याने ही इलेक्ट्रिक कार बनवली आहे. प्रदूषणाची वाढती समस्या आणि इंधनाचे वाढते दर पाहता त्याने ही इलेक्ट्रिक कार बनवली आहे. त्यासाठी त्याला पाच महिन्यांचा कालावधी लागला आहे. कारचे बॉडीवर्क, डिझायनिंग, पेंटिंग अशा सगळ्या गोष्टी त्यानेच स्वतःच केल्या आहेत.

रिमोर्ट स्टार्ट, फास्ट चार्जर अन् बरंच काही 

हिमांशूने तयार केलेल्या इलेक्ट्रिक कारचा लूक व्हिंजेट कारसारखा दिसत असला तरी यात अत्याधुनिक कारसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. ही कार रिमोटने चालू-बंद होते. याशिवाय इलेक्ट्रॉनिक स्पीडोमीटर, फास्ट चार्जर, इलेक्ट्रिक सेफ्टीसाठी फ्यूज सिस्टीम, ऍण्टी थेप्ट अलार्म, रिव्हर्स मोड असे फंक्शन कारमध्ये आहेत.