बस सुरू होण्यासाठी विद्यार्थ्यांनी हटवली रस्त्यावरील खडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बदनापूरमध्ये ठेकेदाराने रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा करून रस्त्यावर केवळ खडी टाकून ठेवल्यामुळे जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील धामणगाव येथे जाणारी बस महामंडळाने बंद केली आहे. त्यामुळे गावातील 70 ते 80 विद्यार्थ्यांना सुमारे 10 किलोमीटर पायी प्रवास करावा लागत आहे. गावातील बस पुन्हा सुरू करावी, यासाठी गावातील विद्यार्थ्यांनी शाळेला सुटी घेत रस्त्यावरील खडी हटवण्याचे काम हाती घेतले. बस सुरू होण्यासाठी विद्यार्थ्यांनी केलेला प्रयत्न कौतुकास्पद असला तरी प्रशासन ढिम्म असल्याने जनतेने नाराजी व्यक्त केली आहे. हा रस्ता पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय स्तरावरून प्रयत्न होण्याची गरजही नागरिकांनी व्यक्त केली आहे.

बदनापूर तालुक्यातील धामणगाव ते राजूर फाटा या रस्त्याचे काम एका कंत्राटदाराला देण्यात आले असून मागील वर्षापासून हे काम सुरूच आहे. या कामासाठी खडी टाकून ठेवण्यात आली आहे. ही खडी टोकदार असल्यामुळे वाहने व पायी चालणेही कठीण झाले आहेत. या गावात 70 ते 80 विद्यार्थी विविध शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. परंतु खडी पसरलेल्या रस्त्यामुळे एस.टी. महामंडळाने नियमत चालणारी बस बस केली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी सुमारे 10 किलोमीटर पायपीट करावी लागत आहे.

दोन ते अडीच महिन्यांपासून या रस्त्यावर खडी टाकून ठेवल्यामुळे बस बंद झाल्याने विद्यार्थ्यांबरोबरच ग्रामस्थाचेही हाल होत आहेत. ग्रामस्थांनी व सरपंचांनी वेळोवेळी संबंधित ठेकेदाराला व प्रशासनाला हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांनीच पुढाकार घेत रस्त्यावरील खडी हटवण्याचे काम हाती घेतले आहे. बस जाऊ शकेल, एवढ्या भागातील खडी विद्यार्थ्यांनी हटवली आहे. त्यामुळे आता बस सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.