पाण्याच्या बाटलीत मिसळले विष; शिरटीतील विद्यार्थिनीचा मृत्यू

जयसिंगपूरमधील शिरटी (ता. शिरोळ) येथील शिरटी हायस्कूलमध्ये दहावीत शिकणार्‍या विद्यार्थिनीच्या पिण्याच्या पाण्याच्या बाटलीत विष मिसळून तिला आजारी पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पाच दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेत गंभीर अवस्थेतील विद्यार्थिनीचा सोमवारी मध्यरात्री मृत्यू झाला. सानिका नामदेव माळी (वय 16) असे तिचे नाव आहे. याबाबतची तक्रार तिचे वडील नामदेव मनोहर माळी यांनी शिरोळ पोलिसांत दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

संतप्त नातेवाईकांनी सानिकाचा मृतदेह तब्बल चार तास शिरटी हायस्कूलसमोर ठेवला. या प्रकरणाची कसून चौकशी करावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. पोलिसांच्या आश्‍वासनानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गाव बंद ठेवून सानिकाला श्रद्धांजली वाहण्यात आली. सानिका ही शिरटी हायस्कूलमध्ये दहावीच्या वर्गात शिकत होती. 20 फेब्रुवारी रोजी हायस्कूलमध्ये दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा होती. प्रात्यक्षिकानंतर दुपारी प्रयोगशाळेतून वर्गात आलेल्या सानिकाने आपल्या दप्तरातील बाटलीतून पाणी प्यायले. यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागल्याने ती घरी गेली. तिथे प्रकृती गंभीर झाल्यामुळे तिला प्रथम शिरोळ येथील शतायुषी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायंकाळी तिची प्रकृती अधिकच गंभीर बनल्याने कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. गेले पाच दिवस तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, अन्ननलिकेत संसर्ग झाल्याने सोमवारी मध्यरात्री तिचा मृत्यू झाला.

मंगळवारी सकाळी आठ वाजता कुटुंबीय व नातेवाईकांनी सानिकाचा मृतदेह शिरटी हायस्कूलसमोर आणला. सानिकाच्या मृत्यूची चौकशी होईपर्यंत मृतदेह हलविणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. तणावपूर्ण वातावरणात शाळेचे संचालक, शिक्षक व पोलिसांनी कुटुंबियांना समजाविण्याचा प्रयत्न केला. अखेर या प्रकरणाची सखोल चौकशी करू, असे आश्‍वासन पोलिसांनी दिल्यानंतर तब्बल चार तासांनी मृतदेह हलविण्यात आला. यानंतर तिच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सायंकाळी सानिकाचे वडील नामदेव माळी यांनी शिरोळ पोलिसांत तक्रार गाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला. सानिकाच्या मृत्यूमागचे खरे कारण काय, याविषयी शिरटी गावामध्ये दिवसभर चर्चा सुरू होती.

आपली प्रतिक्रिया द्या