स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने घेतला गळफास

12

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या 25 वर्षीय विद्यार्थ्याने पदमपुरा येथील राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सोमवारी सकाळी उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही. रविवारी म्हाडा कॉलनीत अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाNया विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

धाराशिव जिल्ह्यातील कळंबमधील डिकसळ येथील रहिवासी निकेतन शिवदास आदमाने (25) हा पदमपुरा भागातील बन्सवाल यांच्या घरी आठ महिन्यांपासून खोली भाड्याने घेऊन राहत होता. निकेतन हा शहरात स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आला होता. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यापूर्वी तो चिकलठाणा येथील कंपनीत कामाला होता. रविवारी रात्री जेवण करून तो झोपला आणि मध्यरात्रीच्या सुमारास त्याने लाकडाच्या बल्लीला दोरीने गळफास घेतला.

घरमालक बन्सवाल यांनी सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्याला झोपेतून उठविण्यासाठी आवाज दिला असता खोलीतून प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी दरवाजाच्या फटीतून आतमध्ये डोकावले असता त्यांना निकेतन लटकलेला दिसला. बन्सवाल यांनी तात्काळ निकेतनच्या मित्राला बोलावून घेत घटनेची माहिती वेदांतनगर पोलिसांना दिली. तात्काळ पोलीस निरीक्षक अनिल आडे हे पथकासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश करून निकेतनला खाली उतरवून घाटीत दाखल केले. मयत निकेतनचे वडील हे गावात शेती करतात. निकेतनला एक मोठा आणि एक लहान अशी दोन भावंडे आहेत. निकेतनने आत्महत्या नेमक्या कोणत्या कारणाने केली, हे मात्र कळू शकले नाही. या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार मोहंमद हनिफ यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करीत तपासास सुरुवात केली आहे.

धूत हॉस्पिटलजवळील म्हाडा कॉलनीत राहणारा सूरज दौलत झरे (23) याने रविवारी दुपारी राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सूरज झरे हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता.

15 वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या
भावसिंगपुरा, लालमाती येथील सागर गोरखनाथ मोटे (15) याने रविवारी सायंकाळी राहत्या घरी साडीने गळफास घेतला. बेशुद्धावस्थेत त्यास उपचारासाठी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सागर हा व्यसनाधीन होता. यापूर्वीही त्याने रागाच्या भरात विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्याचे बी. एन. कुNहाडे यांनी अकस्मिक मृत्यूची नोंद करून तपासाला सुरुवात केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या