नीट-यूजीत भौतिक आणि जीवशास्त्राने रडवले, अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न आल्याची विद्यार्थ्यांची तक्रार

कठीण आणि अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्नांनी नीट-यूजीच्या बहुतांश विद्यार्थ्यांना आज चांगलेच रडवले. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी देशस्तरावर झालेल्या या सामाईक प्रवेश परीक्षेला 22 लाख 70 हजार विद्यार्थी बसले होते. भौतिकशास्त्राचा पेपर खूपच कठीण असल्याची आणि अनेक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. तर जीवशास्त्राचा पेपर खूपच वेळखाऊ (लेन्दी) होता. त्यामुळे सायंकाळी परीक्षा केंद्रांबाहेर आलेल्या विद्यार्थ्यांची अवस्था भौतिकशास्त्राने रडवले आणि जीवशास्त्राने थकवले अशी झाली होती.

अनेक परीक्षा केंद्रांवर परीक्षा प्रक्रियेविषयी अज्ञान असलेल्या पर्यवेक्षक आणि कर्मचाऱ्यांमुळे मुलांची गैरसोय झाली. काही केंद्रांवर 20 मिनिटे पेपर उशिरा दिल्याने पेपर लिहिण्यास वेळ अपुरा पडल्याची तक्रार आहे. तर काही केंद्रांवर परीक्षेदरम्यानच पह्टो, सही, माहिती भरून घेणे यांत अमूल्य वेळ घेतला गेल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. काही मुलांना नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून दिले गेलेले पेन नीट चालत नसल्याने वारंवार बदलावे लागत होते. तर काही केंद्रांवर प्रश्नपत्रिकेवर रफ वर्क करण्यास मनाई करण्यात आली. एका परीक्षा केंद्रावर वीज गेल्याने वर्गात अंधार पसरला. वीज येईपर्यंत जवळपास 25 मिनिटे वाया गेल्याची तक्रार पालकांनी केली.

विद्यार्थी-पालकांसाठी पाणी, बिस्किटे

काही केंद्रांनी विद्यार्थी-पालकांसाठी पाणी, बिस्किटांची सोय केली होती, तर विद्यार्थी पह्टो नेण्यास विसरतात म्हणून काही केंद्रांवर विद्यार्थ्यांचे पासपोर्ट आकाराचे पह्टो काढण्याची सोय करण्यात आली होती. अनेक ठिकाणी सुरक्षेकरिता तैनात असलेल्या पोलिसांनीही चुकीच्या केंद्रावर आलेल्या मुलांना योग्य केंद्रावर पोहोचवून मदतीचा हात दिला.

भुवनेश्वरमध्ये चार जणांना अटक

तोतया विद्यार्थी परीक्षेला बसवून वैद्यकीय प्रवेशाची हमी देणाऱ्या चार जणांच्या आंतरराज्यीय टोळीला भुवनेश्वर स्पेशल क्राइम युनिटने अटक केली. झारखंडमधील प्रियदर्शी कुमार, बिहारमधील अरविंद कुमार आणि ओडिशातील सुनील सामंत्रे आणि रुद्र नारायण बेहरा अशी यांचे नावे आहेत. ही टोळी प्रत्येक विद्यार्थ्याकडून 20 ते 30 लाख रुपये उकळत असे.

उन्हातान्हात रांगा

दुपारी 2 वाजता सुरू होणाऱ्या पेपरसाठी अनेक विद्यार्थी सकाळी 10 वाजल्यापासून परीक्षा केंद्राबाहेर प्रवेशासाठी थांबून होते. काही ठिकाणी बायोमेट्रिक तपासणी करण्याकरिता विलंब होत होता. त्यामुळे भरउन्हात विद्यार्थी रांगा लावून केंद्राबाहेर उभे होते.

गुगल मॅपने केला घात

दुपारी 2 वाजता सुरू होणाऱ्या परीक्षेकरिता केंद्रावर 1.30पर्यंत प्रवेश दिला जातो. मात्र, पुण्यात केंद्रीय विद्यालयात पाच विद्यार्थ्यांना उशीर झाल्याने प्रवेश नाकारण्यात आला. गुगल मॅपमुळे शाळा सापडण्यास उशीर झाल्याचे विद्यार्थ्यांनी वारंवार सांगून पाहिले. मात्र त्यांना प्रवेश देण्यात न आल्याने ही मुले रडवेली झाली होती. कुलाब्यातील केंद्रीय विद्यालयातही उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला.

राजस्थानात पेपरसाठी 40 लाखांचा सौदा, तीन जणांना अटक

राजस्थानात ‘नीट’ प्रश्नपत्रिका पुरविण्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांची 40 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या तिघा जणांना स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपने (एसओजी) अटक केली. बलवान (27), मुकेश मीना (40) आणि हरदास (38) अशी तीन आरोपींची नावे आहेत. त्यांनी ‘नीट’चा पेपर फुटल्याचा दावा करून त्यांची फसवणूक केली.