तामिळनाडूत अडकलेल्या विद्यार्थ्यांचे स्वगृही आगमन होताच पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रु

1736

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे तामिळनाडू येथे अडकलेल्या 160 विद्यार्थ्यांना घेऊन येणाऱ्या सात बसेसचे आज मंगळवारी अर्थात 12 मे रोजी दुपारी 12 वाजता जळगावच्या मध्यवर्ती बसस्थानकात आगमन झाले. त्याप्रसंगी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करून भोजनाची व्यवस्था केली होती. दरम्यान, आपल्या गावी सुखरूप पोहचल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला. तसेच दोन महिन्यापासुन लेकरांच्या भेटीची आस लागलेल्या पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रु तरळले.

कोरोना या संसर्गजन्य विषाणूमुळे गेल्या दोन महिन्यांपासून तामिळनाडू राज्यात जळगाव जिल्ह्यातील 160 विद्यार्थी अडकले होते. या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत होती. त्यांना आर्थिक अडचणींसह विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने ते चिंताग्रस्त झाले होते. विद्यार्थ्यांच्या पालकांनी व स्वतः विद्यार्थ्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क साधून जळगावात परत आणण्याची मागणी केली होती. त्यानुसार जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्यासह जिल्ह्यातील विद्यार्थी लॉकडाऊनमुळे तामिळनाडू व केरळ राज्यात अडकलेले असल्याने त्यांना महाराष्ट्रात आणण्याची मागणी मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडे केली होती. या दरम्यान पालकमंत्री पाटील व त्यांच्या कार्यालयाकडुन तामिळनाडूत असलेल्या विद्यार्थ्यांशी थेट संपर्क सुरू होता. दरम्यान राज्य शासनाने परप्रांतीयांना त्यांच्या मुळगावी जाण्यासाठी व इतर राज्यात, जिल्ह्यात अडकलेले नागरिक व विद्यार्थ्यांना परत आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्याशी संपर्क साधून जळगाव जिल्ह्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना देखील आणण्यासाठी पाठपुरावा केला. अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतल्यानंतर 160 विद्यार्थ्यांना तामिळनाडू येथून थेट सांगली (मिरज) येथे आणण्यात आले. तेथून बसेसद्वारे जळगावपर्यंत विद्यार्थ्यांना पोहचविण्यात आले.

जळगाव मध्यवर्ती बसस्थानकात आज 160 विद्यार्थ्यांना घेवून सात बसेस दुपारी 12 वाजेच्या सुमारास दाखल झाल्या. आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वतः पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वागत केले. आलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी शिवभोजन थाळीची व्यवस्था करण्यात आली. बसने जळगाव बसस्थानकात होताच विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. गेल्या दोन महिन्यांपासून परराज्यात अनेक अडचणींना सामना करावा लागला होता. मात्र पालकमंत्री पाटील यांचा आमच्याशी वेळवेळी थेट संपर्क करून दिलासा देत होते, अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. आपण आपल्या गावी आल्याचे पाहून काही विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसून येत होते. तर विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालक व नातेवाईकांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले.

यावेळी रापमचे विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे,आगार व्यवस्थापक प्रज्ञेश बोरसे, स्थानक प्रमुख निलीमा बागुल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण, रमेश पाटील यांच्यासह विद्यार्थ्यांचे नातेवाईक व मित्र परिवार उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसह शासन व प्रशासनाचे मानले आभार

दरम्यान लॉकडाऊनमध्ये अडकून पडलेल्या 160 विद्यार्थ्यांना आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहनमंत्री अनिल परब यांनी मोलाची मदत केली, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. तसेच जिल्हा प्रशासन, राज्य परिवहन मंडळाचे चालक व कर्मचारी, दोन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचे सहकार्य मिळाल्याने त्यांचेही गुलाबराव पाटील यांनी आभार व्यक्त केले आहेत. कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात ‘घरी राहा, सुरक्षित रहा, अनावश्यक बाहेर पडून नका’ असे आवाहनही त्यांनी जिल्हावासीयांना केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या