नाणारमध्ये रिफायनरी होऊ देणार नाही, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा मठ येथील बैठकीत इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोणी येऊन जर नाणार रिफायनरी होणार असे सांगत असेल तर एक पाऊल टाकून तरी दाखवा. आम्ही रिफायनरी होऊच देणार नाही. नाणार येथील भूसंपादन रद्द करणारे राजपत्रच आम्ही काढले आहे. ते राजपत्र नाणारवरचा वज्रलेप ठरले आहे. शिवसेना सत्यवचनी आहे, त्यामुळे एकदा दिलेले वचन आम्ही विसरणार नाही. नाणारमध्ये रिफायनरी होऊ देणार नाही. आज कोकणात उद्योग आणि रोजगार आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.

प्रदुषणविरहित प्रकल्प याठिकाणी आणणार असून काही परदेशी कंपन्यांबरोबर आमची चर्चाही झाली आहे. आम्ही त्यांना स्थानिकांना रोजगार देण्याची अट घातली आहे. त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावे राजापूर, लांजा तालुक्यात आयोजित करून स्थानिकांना रोजगार मिळवून देऊ असे आश्वासन शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले. ते राजापूर विधानसभा मतदार संघाच्या मठ येथे झालेल्या बैठकीत बोलत होते.
शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई पुढे म्हणाले की, राजापूर विधानसभा मतदार संघात शिवसेनेचा विजय होणारच आहे़ 1990 पासून दोन पिढ्यांनी राजापूर मतदार संघातून शिवसेनेला विजय मिळवून दिलेला आहे़ यावेळी तुम्हीही तो विजय मिळवून द्याल. पण तो विजय भव्य पाहिजे असे आवाहन त्यांनी करत कोकणी माणसासाठी शिवसेना नेहमीच छातीचा कोट करून उभी राहिली असल्याचेही देसाई यांनी ठामपणे सांगितले. शिवसेनेने दहा रुपयांमध्ये जेवणाच्या थाळीची घोषणा केली. तुम्हाला माहिती असेल 25 वर्षांपूर्वी आपण 1 रुपयांत झुणका-भाकर देत होतो. आता 10 रुपयात थाळी द्यायला आपल्याला काय कठीण आहे.

त्या थाळीमध्ये चौरस आहार असेल. दहा रुपयात जेवणाची थाळी देण्याचे जाहीर करताना अनेक विद्वानांनी त्यात शंकाकुशंका काढल्या. तामिळनाडूमध्ये जयललिता यांनी दहा रुपयात जेवण द्यायला सुरुवात केली. आंध्रप्रदेमध्येही दहा रुपयात जेवण मिळते, तेव्हा कोणाला शंका का आली नाही, असा सवालही शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी उपस्थित केला. एक रुपयामध्ये आरोग्य सेवा, कमी वीजबील याचा फायदा सर्वसामान्य जनतेला होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवसेना जो शब्द देते तो पूर्ण करून दाखवते. नाणार येथील रिफायनरी रद्द करणार असे सांगून ती रिफायनरी आपण रदद केली. अंगणवाडी सेविकांवरील लावलेला मेस्मा आपण मागे घ्यायला लावला. शेतकऱ्याला कर्जमाफी मिळवून दिली. त्यामुळे शिवसेना जे बोलते ते करते हे जनतेला ठाऊक आहे. बाळासाहेबांच्या समाजकारणाच्या पावलावर पाऊल टाकत उद्धव ठाकरे पुढे चालले आहेत. त्यात आता आदित्य ठाकरे यांचे युवा नेतृत्व महाराष्ट्राला मिळणार असल्याचे शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.

यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख सुधीर मोरे, महायुतीचे उमेदवार बाळ माने, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीकं, जिल्हाप्रमुख विलास चाळके, उपजिल्हाप्रमुख जगदिश राजापकर, महिला आघाडीच्या नेहा माने, वेदा फडके, जि.प.अध्यक्षा स्वरुपा साळवी, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, संदिप दळवी व इतर पदाधिकारी उपस्थित होते. व्यासपीठावर भाषणासाठी उभे राहताच शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले की, आताच मी आणि विनायक राऊत कणकवलीतून नारायण राणे यांची गुळगुळीत करून आलोय. असे म्हणताच सभागृहात हा पिकले पुन्हा एकदा संपूर्ण कोकण भगवेमय होणार असून शिवसेनाचाच विजय होणार असल्याचे सुतोवाच शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी केले. यावेळी स्वाभिमान पक्षाचे सचिन माधळकर आणि अन्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

रत्नागिरी, सिंधुदुर्गात शिवसेनेते 8 आमदार
रत्नागिरी जिल्ह्यातील पाच आणि सिंधुदुर्गातील तीन असे एकूण आठ आमदार विजयी होतील. शिवसेनाप्रमुखांचा सर्वात आवडता मतदार संघ म्हणजे राजापूर या राजापूरातील विसेनेचा भगवा असाच अखंड फडकवत ठेवा, असे आवाहन शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी केले.