
छायाचित्रणाला एक चिकाटी आणि जिद्द लागते ती डॉ. दीपक सावंत यांच्यात आहे. त्यांच्या पुस्तकामुळे आमचा जंगलभ्रमंतीचा अनुभव, ती दृश्ये जशीच्या तशी डोळ्यांसमोर उभी राहिली, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोटोग्राफीच्या आठवणी जागवल्या. तर छायाचित्रण करतानाचा संयम व शांत राहून क्लिक करण्याची निर्णयक्षमता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाच्या वाटचालीत उपयोगी पडत असल्याचे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले.
राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी लिहिलेल्या – वाइल्ड लाइफ फोटोबायोग्राफी आणि उद्धव ठाकरे – द टायगर या दोन पुस्तकांचे प्रकाशन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हीसीच्या माध्यमातून या कार्यक्रमाला उपस्थित होते. ज्येष्ठ छायाचित्रकार मोहन बने, प्रकाशक आनंद लिमये उपस्थित होते.
प्रास्ताविक भाषणात डॉ. दीपक सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमवेत केलेल्या जंगलभ्रमंतीचा आणि त्यांच्यासमवेत केलेल्या छायाचित्रण कलेचा अनुभव सांगितला. वन, जंगल वाचवण्यासाठीचा उद्धव ठाकरे यांचा आग्रह आणि काम यानिमित्ताने जवळून पाहता आले, असे ते म्हणाले.
लोकप्रिय मुख्यमंत्री
फोटोग्राफी करतानाची निर्णयक्षमता त्यांना मुख्यमंत्रीपदाच्या वाटचालीत उपयोगी पडत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातच नाही तर देशात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून त्यांची दुसऱयांदा निवड झाली. कोरोनाकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व यंत्रणांना योग्य दिशा दिली. सगळ्या यंत्रणांना समवेत घेऊन काम केले. याची दखल जागतिक आरोग्य संघटनेसह अनेक संघटनांनी घेतली, असे सुभाष देसाई म्हणाले.
लेखणीने जंगल टिपले
वनरक्षकांच्या अनेक अडचणी असतात. त्यांच्या आरोग्याचे, कुटुंबाचे आणि मुलांचे शिक्षणाचे प्रश्न खूप वेगळे असतात हे या जंगलभ्रमंतीदरम्यानच कळल्याचे ते म्हणाले. वन्यजिवांना आपण त्रास दिला नाही तर ते आपल्याला त्रास देत नाहीत. इथे वावरण्याची एक शिस्त असते, डॉ. सावंत यांनी कॅमेऱयानेच नाही तर लेखणीने जंगल टिपले असल्याचे या दोन पुस्तकांवरून दिसून येते, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.
आठवणी जंगल भ्रंमतीच्या
आजवर अनेक पुस्तकांची प्रकाशने झाली, पण आजचा प्रकाशन कार्यक्रम वेगळा आहे, डॉ. दीपक सावंत यांना छायाचित्रकार, लेखक म्हणून एक वेगळी ओळख देणारा हा कार्यक्रम आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी डॉ. दीपक सावंत यांच्यासमवेत केलेल्या अनेक जंगलभ्रमंतीचा आपला अनुभव सांगितला. ज्या कान्हा जंगलापासून वाइल्ड फोटोग्राफीला आपण सुरुवात केली तिथे फिरत असताना वनरक्षकांच्या असलेल्या अडीअडचणी जाणवल्या. त्यातून आरोग्य शिबिराचे आयोजन, रुग्णवाहिकेची उपलब्धता, औषधांची उपलब्धता अशा अनेक बाबींच्या पूर्ततेत डॉ. सावंत यांनी केलेले कामही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


























































