मनोहर पर्रिकर यांचे मार्गदर्शक सुभाष वेलिंगकर भाजप विरोधात लढणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पणजी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोव्यातील माजी संघचालक आणि माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे एकेकाळचे मार्गदर्शक सुभाष वेलिंगकर पणजी विधानसभा मतदारसंघात भाजपविरोधात पोटनिवडणूक लढविणार आहेत. त्याबाबतची घोषणा शुक्रवारी पणजीत करण्यात आली आहे. मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतरची सहानुभूती पणजीत आता निश्चितच नाही. पर्रिकरांविषयी लोकांना आदर असला तरी, मतदार पणजीचे हित लक्षात घेऊनच मतदान करतील, ते कुणा एका कुटुंबाला मते देणार नाहीत, असे सुभाष वेलिंगकर यांनी सांगितले आहे. वेलिंगकर यांचा सामना पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर यांच्याशी होण्याची शक्यता आहे.

गोवा सुरक्षा मंचातर्फे वेलिंगकर लढणार आहेत. सुरक्षा मंचाचे मार्गदर्शक अरविंद भाटीकर यांनी वेलिंगकर यांच्या नावाची पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली आहे. पणजीतील लोकांनी वेलिंगकर यांनाच तुम्ही उमेदवार म्हणून उभे करा, आम्ही पाठींबा देऊ असे आम्हाला सांगितले. त्यामुळे सुरक्षा मंचाने वेलिंगकर यांचे नाव निश्चित केल्याचे भाटीकर यांनी सांगितले. पांडुरंग नाडकर्णी, किरण नायक, महेश म्हांब्रे, अ‍ॅड. स्वाती केरकर आदी यावेळी उपस्थित होते.

आपण पणजीमध्येच लहानाचे मोठे झालो. आपला जन्म पणजीत झाला. भाजपने पणजीत फक्त बाबूश मोन्सेरात यांच्या सोयीचेच राजकारण केले. त्यासाठी ताळगाव मतदारसंघाचा भाजपने बळी दिल्याचा आरोप सुभाष वेलिंगकर यांनी केला आहे. भाजपने पणजीची 25 वर्षे लूट केली आहे. पणजी शहर फसवले गेले आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली विकास किती झाला व कमिशन किती खाल्ले गेले हे पणजीकरांना माहित आहे. आम्हाला तत्त्वांवर आधारीत राजकारण करायचे आहे. पर्रिकर यांच्याविषयी पणजीकरांना आदर आहे पण त्यांच्या निधनानंतर सहानुभूती आता दिसत नाही. त्यामुळे त्याचा फायदा भाजपला होणार नाही. बांबोळीतील मोदींच्या सभेलाही गर्दी झाली नाही. पणजीचे हित कोणत्या गोष्टीत आहे ते ओळखूनच पणजीतील नागरिक मतदान करतील, असेही ते यावेळी म्हणाले. काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार बाबूश मोन्सेरात आणि आपतर्फे वाल्मिकी नाईक यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. भाजपतर्फे उत्पल पर्रिकर आणि सिद्धार्थ कुंकळ्येकर यांची नावे चर्चेत असून अजून भाजपने आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. गोवा सुरक्षा मंचतर्फे वेलिंगकर आपला उमेदवारी अर्ज आज सादर करण्याची शक्यता आहे.