ब्रह्मपुत्रेचे पाणी काझीरंगा अभयारण्यात घुसले, हजारो प्राण्यांवर संकट

42

सामना ऑनलाईन | दिसपूर

उत्तर आणि ईशान्य हिंदुस्थानात पावसाचा कहर सुरू आहे. मुसळधार पावसामुळे ब्रह्मपुत्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. याचा फटका आसाममधील 28 जिल्हांना बसला असून, यामुळे 26.5 लाख लोक प्रभावीत झाले. मानवासह प्राण्यांनाही याचा फटका बसला असून काझीरंगा अभयारण्यात ब्रह्मपुत्रेचे पाणी घुसल्याने हजारो प्राण्यांवर संकट आले आहे. पुरामुळे अभयारण्यातील 70 टक्के भाग प्रभावित झाला असून 95 शिबिरे पाण्यात बुडाली आहेत. यामुळे प्राण्यांना स्थलांतर करावे लागले आहे.

काझीरंगा अभयारण्य हा मुख्यत्वे एक शिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. तसेय राष्ट्रीय प्राणी वाघ आणि हत्तींचाही वावर या अभयारण्यात आहे. पावसाचे पाणी अभयारण्यात घुसल्याने प्राण्यांना उंचावरील प्रदेशात हलवण्यात आले आहे. पुराचे पाणी आत घुसल्याने प्राण्यांची खाण्याची अबाळ होणार नाही याकडे वनाधिकारी लक्ष ठेवून आहेत. आमच्याकडे पुरेसा चारा असून वनाधिकारी हाय अॅलर्टवर असल्याची माहिती अभयारण्यातील अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यांना दिली आहे.

एक शिंगी गेंड्यांच्या सुरक्षेवर भर
दरम्यान, अभयारण्यात पाणी भरल्यामुळे एक शिंगी गेंड्यांनाही सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले आहे. पाण्यापासून वाचण्यासाठी गेंडे राष्ट्रीय महामार्गावर येतात. जंगल सोडून गेंडे महामार्गावर आल्याने शिकाऱ्यांकडून त्यांना धोका वाढतो. यामुळे वनविभाग हाय अॅलर्टवर असून सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. तसेच अभयारण्यातील महामार्गावरून दोन्ही बाजूने प्रवास करणाऱ्यांना वाहनांवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे.

लाखो लोक विस्थापित
आसाममधील 28 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. बारपेटा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नुकसान झाले असून 7.35 लाख लोक विस्थापित झाले आहे. तसेच मारीगाव व धुब्री जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, असे वनविभागाने सांगितले. तसेच राज्यात आतापर्यंत 25 जिल्ह्यातून 14.06 लाख लोक विस्थापित झाल्याची माहिती मिळाली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या