
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजपचे ज्येष्ठे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नागरी अन्नपुरवठा विभागाचे राज्यमंत्री योगेश कदम यांची चांगलीच खरडपट्टी काढली. राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याच्या मुद्द्यावरून मुनगंटीवार यांनी योगश कदम यांच्या प्रश्नांची सरबत्ती केली. लक्षवेधीवर बोलताना मंत्र्यांनी अभ्यास करू यायला हवे. चुकीची आकडेवारी देऊ नये. तसेच मुख्यमंत्र्यांशी बोलतो, बैठक लावतो, चर्चा करतो, मंथन करतो हे चालत नाही. मी काय तुम्हाला उखाणे घ्यायला सांगतोय का? अशा शब्दात मुनगंटीवार यांनी योगेश कदम यांना सुनावले.
राज्यातील सुमारे 7 लाख धान उत्पादक शेतकरी सध्या बोनसच्या प्रतीक्षेत असून, या मुद्द्यावरून विधानसभेत सत्ताधाऱ्यांमध्येच जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. सुधीर मुनगंटीवार यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या संथ कारभारावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. 15 डिसेंबर 2025 रोजी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असता, त्यांनी बोनसबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. जानेवारी महिन्यातच शासन निर्णय निघणे अपेक्षित होते. मात्र, आधी निवडणुकांचे कारण देण्यात आले आणि आता प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.
मुख्यमंत्र्यांच्या स्पष्ट सूचनांनंतरही अन्न व नागरी पुरवठा विभाग अद्याप सुस्त का? असा सवाल मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यास होत असलेला विलंब हा संविधानाचा अवमान असल्याचेही मुनगंटीवार यांनी नमूद केले. यावर उत्तर देताना योगेश कदम यांनी सरकारने आतापर्यंत किती निधी खर्च केला, याची आकडेवारी सभागृहासमोर ठेवली. 2022-23 या आर्थिक वर्षात 823 कोटी रुपये, 2023-24 या आर्थिक वर्षात 1378 कोटी रुपये आणि 2024-25 या आर्थिक वर्षात 1628 कोटी खर्ज केल्याचे कदम यांनी सांगितले. तसेच नोंदणीकृत शेतकऱ्यांना ही रक्कम दिली जाते. मात्र, प्रत्यक्ष धान खरेदी आणि बोनसचे प्रमाण यांची फेरतपासणी करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
योगेश कदम यांच्या उत्तरावर असमाधान व्यक्त करत मुनगंटीवार पुन्हा आक्रमक झाले. धान उत्पादक हा राज्यातील सर्वात कष्टकरी आणि गरीब शेतकरी आहे. अनुदानात वाढ झाल्याने निधीचा आकडा मोठा दिसतोय, पण प्रत्यक्ष मदत वेळेवर मिळणे महत्त्वाचे आहे. पोर्टलवर नोंदणी असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला बोनस मिळालाच पाहिजे, तिथे केवळ चर्चा आणि मंथन करून वेळ काढू नये, अशा शब्दात मुनगंटीवार यांनी सुनावले. यानंतर काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनीही हाच मुद्दा लावून धरत धान उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची मागणी केली.
धान उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथांबाबत, शेतकऱ्यांच्या बोनस बाबत सभागृहात मांडलेल्या प्रश्नाला राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलेले उत्तर समाधानकारक नाही, अशी ठाम भूमिका विजय वडेट्टीवार यांनी मांडली. सभागृहात मांडलेल्या लक्षवेधी प्रश्नाला मंत्री महोदयांनी मुद्देसूद उत्तर द्यावे, पुढील कॅबिनेट बैठकीत निर्णय घेण्याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी, असेही ते म्हणाले. आज शेतकऱ्यांच्या धानाला 15000 रूपयेही भाव मिळत नाही. अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे व एकरी 20 हजार रुपये जाहीर करावेत अशी मागणी सभागृहात केली. राज्यमंत्री योगेश कदम यांनी उत्तर देताना याबाबत सरकार गंभीर असून शासन निर्णय काढत असताना कार्यपद्धती ठरवत आहे असे सांगितले. तसेच, मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन कॅबिनेट समोर प्रस्ताव ठेवू अशी माहिती दिली. शेतकऱ्यांवर आलेले संकट पाहता या प्रक्रियेला सरकारकडून गती मिळेल, अशी आशा वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.




























































