मंत्रालयातही जादूचे पाणी देणारे अशोक खरात! सुधीर मुनगंटीवार यांची तुफान टोलेबाजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंत्र्यांच्या बैठका तसेच आश्वासन समितीच्या बैठकांना दांडी मारणाऱया आणि फाईल ‘दाबून’ ठेवणाऱया अधिकाऱयांवर आज भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तुफान हल्लाबोल केला. मंत्रालयात जादूचे पाणी देणारे अशोक खरात आहेत. त्यांना वरचढ होऊ देऊ नका, असा सल्लाही मुनगंटीवार यांनी दिला.

विधानसभा आश्वासन समितीचे अध्यक्ष रवी राणा यांनी पंधराव्या महाराष्ट्र विधानसभा आश्वासन समितीचा पहिला अहवाल विधानसभेत सादर केला. या बैठकीला अधिकारी अनुपस्थित राहिल्याचे त्यांनी या वेळी सभागृहाला सांगितले. त्यावरून सुधीर मुनगंटीवार यांनी अशा अधिकाऱयांवर तुफान हल्लाबोल करताना दांडी मारणाऱया अधिकाऱयांची तुलना भोंदूबाबा अशोक खरातशी केली. अधिकारी आश्वासन समितीला येत नाही. याचा अर्थ मंत्रालयातही जादूचे पाणी देणारे अशोक खरातसारखे अधिकारी आहेत. त्यांचे जादूचे पाणी लोकशाहीवर भारी होऊ देऊ नका; अन्यथा आत्म्याविना शरीर, इंजिनाविना गाडी, पेट्रोलविना स्कूटर अशी आमची अवस्था होईल.

अशोक खरात अधिकाऱयांना फसवत नाही, तर अधिकारीही फसवतात असे सांगताना त्यांनी विदर्भातील गोंडवाना विद्यापीठाचे उदाहरण दिले. गोंडवाना विद्यापीठाचे उपपेंद्र होणार असे आश्वासन मंत्र्यांनी दिले. पण त्याची फाईल अधिकाऱयांकडे गेल्यावर अधिकारी वेगळेच लिहितात याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बैठकांना अनुपस्थिती लावणाऱया अधिकाऱयांना कडक शब्दांत इशारा दिला. यापुढे कोणत्याही समितीचे अधिकारी अनुपस्थित राहिले तर त्वरीत कारवाई केली जाईल.