धरणक्षेत्रात समाधानकारक वाढ; नातूवाडी 68 टक्के पिंपळवाडी, 67 टक्के

887

खेड तालुक्यातील नातूनगर आणि पिंपळवाडी धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत असल्याने तालुक्यातील या दोन्ही धरणांच्या पाणीसाठय़ात समाधानकारक वाढ होत आहे. पाटबंधारे विभागाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, नातूवाडी धरण परिसरात आतापर्यंत कोसळेल्या 1115 मि.मी. पावसामुळे या धरणातील पाणीसाठा 19.304 दलघमी (68 टक्के), तर पिंपळवाडी धरण परिसरात झालेल्या 1488 मि.मी. पावसामुळे या धरणात 18.895 दलघमी (67 टक्के) इतका पाणीसाठा झाला आहे.

खेड-मुंबई महामार्गालगत असलेल्या नातूवाडी धरणाची उंची 47.25, तर रुंदी 900 मीटर इतकी आहे. या धरणाची पाणी साठवणक्षमता 28.08 दलघमी इतकी आहे. या धरणातील पाण्यावर 2390 हेक्टर शेतीचे सिंचन होत असल्याने नातूवाडी धरणातील पाण्यावर दुबार शेती केली जाते. डुबी नदीवर बांधण्यात आलेल्या पिंपळवाडी धरणाचे पाणी अद्यापि सिंचनासाठी वापरले जात नसले, तरी या धरणातील पाण्यावर अनेक गावांतील नळपाणी योजना चालतात.

पिंपळवाडी धरणाची लांबी 633 मीटर, तर उंची 50.84 मीटर इतकी आहे. या धरणाची पाणी साठवणक्षमता 27.59 दलघमी, सिंचनक्षमता 1336 हेक्टर इतकी आहे. या धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये खोपी, मिर्ले, कुंभाड, कुळवंडी, बिजघर ही गावे येतात. तर, नातूवाडी धरणाचा उधळे, नातूनगर, चाकाळे, भडगाव, जामगे या गावांना लाभ होत आहे.

तालुक्याला पाणीटंचाईची झळ जाणवणार नाही

दुबार शेतीबरोबरच पाणीटंचाईच्या काळात तालुक्यातील अनेक गावांची तहान भागविणाऱया नातूवाडी आणि पिंपळवाडी या दोन्ही धरणक्षेत्रांमध्ये समाधानकारक पाऊस झाला तर उन्हाळ्यात तालुक्याला पाणीटंचाईची झळ तितकीशी बसत नाही. त्यामुळे सद्यःस्थितीत धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस कोसळत असल्याने यंदा तालुक्याला पाणीटंचाईची झळ तितकीशी जाणवणार नाही, असे संकेत मिळू लागले आहेत. धरणक्षेत्रात पावसाचा जोर असाच कायम राहिला तर येत्या काही दिवसांत ही दोन्ही धरणे पूर्ण क्षमतेने भरतील, असा विश्वास पाटबंधारे विभागाचे अभियंता श्रीमंगले यांनी व्यक्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या