‘एफआरपी’चे अद्याप 99 कोटी थकीत

प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । नगर

साखर काराखान्यांकडे शेतकर्‍यांची एफआरपीची रक्कम गेल्या अनेक महिन्यांपासून थकत चालली आहे. वेळोवेळी मागणी करुनही रक्कम मिळत नाही. उस गाळप पूर्ण होऊनही आता जवळपास अडीच महिने उलटले आहे. एफआरपीची अद्यापपर्यंत 99 कोटी रुपयांची थकबाकी कारखान्यांकडे असल्याने ती वेळेत मिळणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गेल्या हंगामात नगर जिल्ह्यात विक्रमी साखर उत्पादन झाले असले तरी साखरेची विक्री होत नसल्याने ऊस उत्पादकांची थकीत रक्कम देण्यास कारखान्यांसमोर अडचणी उभ्या राहिल्या होत्या. त्यामुळे ऊस उत्पादकांची थकीत रक्कम देण्यासाठी केंद्र सरकारकडून कारखान्यांना ’सॉफ्ट लोन’ मंजूर झाले होते. बँकांनी दिलेल्या कर्जावरील व्याज एका वर्षापर्यंत केंद्र सरकार भरणार आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध झाले आहे. नगर जिल्ह्यातील 15 आणि नाशिक जिल्ह्यातील दोन अशा 17 साखर कारखान्यांना 428 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी कर्ज मंजूर झाल्याने त्यातून थकीत ’एफआरपी’ची रक्कम देण्यात आली. त्यानंतरही साखर कारखान्यांकडे 147 कोटी रुपये थकीत राहिले होते. साखर कारखान्यांनी साखरविक्री करून ’एफआरपी’ची रक्कम देऊन अजूनही अकरा कारखान्यांकडे 98 कोटी 75 लाख रुपये थकीत आहेत. ’एफआरपी’ची रक्कम न दिल्याने कुकडी कारखान्यावर साखर आयुक्त कार्यालयाकडून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. या कारखान्यांची साखर जप्त करून विक्री करून ऊस उत्पादकांचे पैसे दिले जाणार आहेत. या कारखान्याकडे 22 कोटी रुपयांची थकबाकी आहे. तर प्रवरा सहकारी कारखान्याकडे 19 कोटी 90 लाख रुपयांची थकबाकी आहे. तर गणेश, वृद्धेश्वर, डॉ. बा. बा. तनपुरे, प्रसाद, जय श्रीराम, साईकृपा (हिरडगाव) या कारखान्यांकडे ’एफआरपी’ची रक्कम शिल्लक आहे. या कारखान्यांकडे कमी रक्कम थकीत असल्याने साखरविक्री करून ऊस उत्पादकांचे पैसे दिले जाणार असल्याची माहिती साखर कारखानदारांकडून मिळाली.

कारखान्यांकडील थकित ’एफआरपी’

कारखाना थकित रक्कम

  • प्रवरा 19 कोटी 90 लाख
  • गणेश 13 कोटी 11 लाख
  • कुकडी 22 कोटी 5 लाख
  • वृद्धेश्वर 1 कोटी 11 लाख
  • जय श्रीराम 2 कोटी 37 लाख
  • वसंतदादा 9 कोटी 75 लाख
  • केजीएस 5 कोटी 26 लाख