
सामना प्रतिनिधी । औसा
औसा तालुक्यातील अशिव येथील सर्वे नंबर 107 मधील खांबावरील लाईटच्या तारा तुटून शेतकऱ्याचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सोमवारी सकाळी 11 वाजता अशिव शिवारातील सर्वे नंबर 107 मध्ये सुनिता अनिल लोखंडे यांची शेतजमीन असून त्यांच्या शेतात दोन एकर ऊस आहे. त्या शेतातील खांबावरील वीजेच्या तारा तुटून पडल्याने दोन एकर ऊस जळून खाक झाल्याने दोन लाखांचे नुकसान झालेले आहे.
औसा तालुक्यातील शेतकरी संकटांचा सामना करीत असतानाच शेतातील उभा उस जळाल्याने शेतकऱ्याची अडचण वाढली आहे. औसा शहरासह तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी महावितरण कंपनीचे खांब आहेत. काही ठिकाणी अजूनही चोरुन वीज वापरली जाते. यात त्या भागातील लाईनमन, सब ईजिनिअर , ईजिनिअर या सर्वांची साखळी बनलेली आहे. एखाद्या व्यक्तीने तक्रार केली तर त्याच्याशी तडजोड केली जाते. आम्ही संबंधीतावर कारवाई करु असे आश्वासनही देण्यात येते. मात्र, वीजचोरी करणाऱ्यांना पाठीशी घालण्यात येते, असा आरोप होत आहे. अनेक तक्रारी महावितरन कंपनीच्या विरोधात येत आहेत. वेळीच महावितरनच्या कर्मचाऱ्यांनी लक्ष दिले असते तर झालेले दोन लाखाचे नुकसान झाले नसते. महावितरणने तक्रारींची दखल घ्याली अशी मागणी होत आहे.




























































