‘स्वाभिमानी’ 3400 रुपये पहिल्या उचलीवर ठाम! ऊसदराचा चेंडू जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात

राज्यात एक नोव्हेंबरपासून ऊस गळीत हंगाम सुरू होत असला तरी अहिल्यानगर जिह्यात ऊसदराचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तीव्र भूमिकेनंतर प्रशासनाने अखेर हस्तक्षेप करत शुक्रवारी (दि. 31) सकाळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक बोलावल्याची माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे यांनी दिली आहे.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ठाम भूमिका घेत मागील हंगामातील फरक 200 रुपयांप्रमाणे दिल्याशिवाय आणि चालू हंगामाची पहिली उचल 3400 रुपये प्रतिटन ठरवल्याशिवाय ऊसतोडणी सुरू करू देणार नाही, असा इशार दिला आहे. या बैठकीसाठी साखर प्रादेशिक सहसंचालक संजय गोंदे यांनी सर्व साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱयांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. या बैठकीत 2025–26 हंगामासाठी ऊसदर निश्चित केला जाणार असून, जिह्यातील हजारो शेतकऱ्यांचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे.

कारखानदार आणि साखर व्यवस्थापन मंडळ यांच्यात संगनमत होऊन दर जाणीवपूर्वक कमी ठेवले जात आहेत. सध्या साखरेचा भाव 4200 ते 4400 प्रतिक्विंटल असून, कारखानदारांना विक्रमी नफा मिळत असताना शेतकऱयांना न्याय्य दर दिला जात नाही, असा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे. खत, मजुरी, वाहतूक आणि डिझेलच्या वाढलेल्या किमतींमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पहिली उचल 3400 आणि अंतिम दर 3600 प्रतिटन मिळालाच पाहिजे, अशी मागणी संघटनेने केली आहे.

उसाची ‘सोन्याची’ कांडी

यावर्षी उसाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात झाले असून, साखरेला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. त्यामुळे शेतकऱयांनी घाई न करता चांगला दर व वजनाची खात्री देणाऱया कारखान्यालाच ऊस द्यावा, असे आवाहन ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे यांनी केले आहे. यावर्षी उसाची कांडी ही सोन्याची कांडी ठरणार आहे, असे ते म्हणाले.