
>> सुजाता बाबर
अंधाऱ्या अवकाशात शनीभोवती फिरणारा एक गूढ नैसर्गिक उपग्रह म्हणजे टायटन. त्याच्या दाट नारिंगी आच्छादनाखाली काय दडले आहे हे माणसाला नेहमीच भुरळ घालणारे कोडे राहिले आहे. ना सूर्यप्रकाशाची ऊब, ना पाण्याचा ओलावा, तरीही तिथे काहीतरी ‘घडते’ आहे! वैज्ञानिकांनी आता त्या रहस्याच्या पडद्यामागे डोकावून पाहिले आणि जे उघड झाले ते आपल्या संपूर्ण रसायनशास्त्रालाच प्रश्न विचारणारे ठरले.
शनीचा सर्वात मोठा उपग्रह टायटन हा दीर्घकाळापासून वैज्ञानिकांसाठी एक गूढ आणि मोहक प्रयोगशाळा ठरला आहे. त्याच्या घनदाट नारिंगी वातावरणात दडलेले रहस्य, मिथेन आणि इथेनच्या तलावांनी व्यापलेला पृष्ठभाग, तसेच त्याचे अतिशीत वातावरण एकत्र आल्यामुळे टायटन जीवनाच्या उत्पत्तीचा मागोवा घेणाऱया संशोधनासाठी आदर्श ठिकाण आहे. पण नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनामुळे या सर्व कल्पनांना एक नवी कलाटणी मिळाली आहे.
स्वीडनमधील चाल्मर्स युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी आणि नासाच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार टायटनच्या पृष्ठभागावरील रसायनशास्त्र आपल्याला ज्ञात असलेल्या नियमांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. तापमान सुमारे उणे एकशे ऐंशी अंश सेल्सिअस इतके घटते तेव्हा ध्रव ध्रुवीय आणि अध्रुवीय पदार्थांमधील वर्तन बदलते. पृथ्वीवर पाणी आणि तेल एकमेकांत मिसळत नाहीत, पण टायटनवरील अशा परिस्थितीत मिथेन, इथेन आणि हायड्रोजन सायनाइड यांच्या अणूंमध्ये एकत्र येऊन नवीन प्रकारच्या स्थिर संरचना म्हणजे सह-स्फटिके तयार होतात.
ही घटना केवळ रासायनिकदृष्टय़ा नाही, तर खगोलजीवशास्त्राच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची आहे. कारण पृथ्वीवरील जीवनाची सुरुवात पाणी आणि कार्बन संयुगांच्या परस्परसंवादातून झाली असे मानले जाते. पण जर टायटनसारख्या थंड, पाणीविरहित वातावरणातही काही प्रकारची सेंद्रिय संरचना घडू शकते तर जीवनाच्या शक्यतांचा व्यास अनंत पटींनी वाढतो. आपण शिकलेले प्राथमिक रसायनशास्त्र टायटनवर लागू होत नाही. त्यामुळे रासायनिक जीवनाचे परिभाषित निकष नव्याने तपासावे लागतील.
टायटनच्या वातावरणात प्रामुख्याने नायट्रोजन असून त्यात मिथेनचा अंश मोठा आहे. हाच मिथेन पावसाच्या स्वरूपात पडून तलाव तयार करतो जे पृथ्वीवरील जलचक्रासारखे पण पूर्णत वेगळ्या रसायनावर आधारित चक्र आहे. हे ‘हायड्रोकार्बनचे हवामान चक्र’ इतके विशिष्ट आहे की ते पृथ्वीबाहेरील ग्रहांवर वातावरणीय संतुलन कसे राखले जाते याचे नवे मॉडेल देऊ शकते.
या शोधामुळे आणखी एक प्रश्न निर्माण होतो की जीवनासाठी पाणी आवश्यकच आहे का? टायटनवरील परिस्थितीत पाण्याचे स्वरूप पूर्णत गोठलेले आहे, परंतु तिथे मिथेन-इथेनचे प्रवाही द्रवपदार्थ जीवनासमान रासायनिक संवाद घडवू शकतात. यामुळे ‘जीवनाची संकल्पना’ या शब्दाचा वैज्ञानिक अर्थ अधिक व्यापक झाला आहे.
आता नासाच्या आगामी ड्रगनफ्लाय मोहिमेकडून या रहस्यावर अधिक प्रकाश पडेल. ही मानवरहित रोटर-यंत्रणा 2030 च्या दशकात टायटनवर उतरवली जाणार असून ती तिथल्या भूभाग, वायूघटक आणि सेंद्रिय पदार्थांची प्रत्यक्ष नमुनेवारी करेल. यामुळे हे नव्याने आढळलेले रासायनिक सह-स्फटिक खरोखर नैसर्गिक स्वरूपात अस्तित्वात आहेत का, हे निश्चित होईल.
टायटनकडे पाहताना आपण केवळ एका उपग्रहाचा नव्हे, तर आपल्या ‘रसायनशास्त्राच्या सीमां’चा अभ्यास करत आहोत. पृथ्वीवरील जीवन घडवणाऱया प्रक्रियांच्या बाहेरही विश्वात अनेक शक्यतांचे दरवाजे खुले आहेत. कदाचित टायटन आपल्याला सांगत आहे की जीवन केवळ पाण्यातच नव्हे, तर कल्पनेपलीकडच्या रसायनांतही उमलू शकते. अशा शोधांमुळे केवळ टायटनचेच नाही, तर आपल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे विश्वही नव्याने उलगडते आहे.
(लेखिका खगोलतज्ञ आहेत.)





























































