सुखोई विमान अपघातग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई द्यावी, छगन भुजबळ यांचे एचएएल अधिकाऱ्यांना आदेश

1348

सन 2018 मध्ये पिंपळगाव-बसवंतजवळ सुखोई विमान कोसळून शेतजमिनींचे 14 कोटीहून अधिक नुकसान झाले आहे. कंपनीकडून केवळ 14 लाखांची भरपाई दिली जात आहे. ही मदत तुटपुंजी असून, नुकसानीच्या प्रमाणात शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, असे आदेश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी एचएएल अधिकाऱ्यांना दिले.

सुखोई विमान अपघातग्रस्त शेतकऱ्यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली. त्यानंतर आज सकाळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या दालनात छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी आमदार दिलीप बनकर, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, अतिरिक्त जिल्हाधिकारी नीलेश सागर यांच्यासह एचएएल विभागाचे अधिकारी व नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी मांडल्या. दोन वर्षे होवून देखील कंपनीकडून अद्याप मदत देण्यात आलेली नाही. कंपनीने शेतकऱ्यांना देवू केलेली रक्कम केवळ 14 लाख रुपये आहे. प्रत्यक्ष 14 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना देण्यात येणारी रक्कम तुटपुंजी आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. त्यामुळे कंपनीने केवळ इन्शूरन्सच्या बदल्यात मिळणाऱ्या पैशाव्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या प्रमाणात मदत द्यावी. यासाठी एचएएलने लवकरात लवकर प्रस्ताव तयार करून आपल्या वरिष्ठ विभागास पाठवावा व शेतकऱ्यांना तातडीने ही रक्कम द्यावी, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

आपली प्रतिक्रिया द्या