
सुलोचनादीदी गेल्या. मराठी आणि हिंदी रूपेरी पडद्यावरील मांगल्य हरपले. आज संपूर्ण सिनेसृष्टीची ‘आई’ कायमची पडद्याआड गेली, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भावपूर्ण आदरांजली अर्पण केली आहे.
आपल्या शोकभावना व्यक्त करताना उद्धव ठाकरे म्हणाले, मराठी सिनेमाच्या सुवर्ण काळाच्या त्या बहुधा अखेरच्या साक्षीदार. त्यांचा एकूणच जीवनपट खूपच संघर्षमय होता. आपल्या अभिनय कौशल्याने त्यांनी अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार पटकावले. सिनेसृष्टीतील सर्वोच्च मानला जाणारा ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव व्हावा, अशी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. ठाकरे परिवाराशी तर सुलोचनादीदींचा अत्यंत निकटचा स्नेह होता. समोर येताच पायाला हात लावावा असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. अभिनेत्री ते चरित्र अभिनेत्री असा त्यांनी प्रवास केला; पण ‘मोलकरीण’ या सिनेमातून ‘आई’ची भूमिका साकारली आणि तीच त्यांची ओळख बनली. आज संपूर्ण सिनेसृष्टीची ‘आई’च काळाच्या पडद्याआड गेली आहे. मी संपूर्ण शिवसेना परिवारासह त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो, अशा भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत.