
नागपूरच्या गोरेवाडा प्रकल्पातील सुलतान (सी-1) हा वाघ आता मुंबईच्या नॅशनल पार्कमध्ये दाखल होणार आहे. वाघांच्या प्रजनन काळात त्यांच्या गुणसूत्र गुणधर्मात बदल व्हावा म्हणून सुलतानला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आण्यासाठी केंद्रीय वन विभागाने परवानगी दिली आहे. त्यानुसार संजय गांधी उद्यानाची टीम आज दुपारी नागपूर येथून सुलतानला घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे.
प्रजननकाळात त्यांच्या गुणसूत्र गुणधर्मात बदल व्हावा म्हणून नागपूरच्या गोरेवाडा केंद्रात बंदिस्त असलेल्या सुलतानला मुंबईला हलवण्याबाबत दिल्लीच्या केंद्रीय चिडीयाघर प्राधिकरणाने नुकतीच परवानगी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर त्याला मुंबईत आणण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे अधीक्षक विजय बारब्दे आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांची नियुक्ती केली होती. त्यानुसार त्यांनी गोरेवाडा प्रकल्पाचे विभागीय व्यवस्थापक नंदकिशोर काळे यांच्या उपस्थितीत सुलतानची तपासणी करून मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचे गोरेवाडा प्रकल्प प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


























































