हिंदुस्थानचा स्टार टेनिसपटू सुमित नागलने एटीपीच्या एकेरी क्रमवारीत कारकडर्दीतील सर्वोत्तम 71 व्या स्थानी झेप घेत ऐतिहासिक कामगिरी केली. ऑलिम्पिकच्या तयारीला लागलेला नागल मागील आठवडय़ात जागतिक क्रमवारीत 77 व्या स्थानी होता.
सुमित नागलला पेरुगिया एटीपी चॅलेंजर स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्याला अंतिम लढतीत इटलीच्या लुसियानो डार्डेरीने 6-1, 6-2 असे पराभूत केले. या पराभवामुळे नागलची विजयी मालिकाही खंडित झाली. कारण या पराभवापूर्वी त्याने लागोपाठ नऊ विजय मिळविले होते. सुमित नागलने नुसती क्रमवारीत सुधारणा केली नाही, तर पुरुष एकेरीत पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीटही बुक केले आहे. या वर्षीच्या ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये त्याने दुसरी फेरी गाठली होती, मात्र फ्रेंच ओपनमध्ये तो सलामीलाच गारद झाला होता. नागलने या महिन्याच्या प्रारंभी जर्मनीतील हीलब्रॉन नेकरकप चॅलेंजर स्पर्धा व त्याआधी, फेब्रुवारीमध्ये चेन्नई ओपनचे विजेतेपद पटकाविले होते.