
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अजितदादांची पत्नी सुनेत्रा पवार यांनी महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारण्यास होकार दर्शविला आहे. त्यानंतर अजित पवार गटाने शनिवारी दुपारी विधिमंडळ पक्ष निवडीसाठी आमदारांची तातडीची बैठक विधान भवनात बोलविली आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड झाल्यावर त्या सायंकाळी पाच वाजता लोकभवन येथे छोटेखानी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्यानंतर अजितदादांचा उत्तराधिकारी कोण, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांच्यासह अजित पवार गटाच्या आमदारांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन सुमारे पाऊण तास त्यांच्याशी चर्चा केली. अजितदादांच्या जागी उपमुख्यमंत्रीपदी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची नियुक्ती केली जावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि जनभावनाही तशीच आहे असेही त्यांनी फडणवीस यांना सांगितले. त्यावर लागलीच देवाभाऊंनी दादांच्या राष्ट्रवादीच्या घडय़ाळाला चावी देत सकारात्मक प्रतिसाद दिला.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीनंतर छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘उद्या दुपारी विधीमंडळ पक्षनेता निवडला जाईल. विधीमंडळ पक्षनेतेपदी सुनेत्रा पवार यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब होईल. त्या निवडीचे पत्र तातडीने मुख्यमंत्र्यांना दिले जाईल आणि छोटेखानी कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदी शपथविधी होईल’. सर्व निर्णय पवार कुटुंबीयांशी चर्चा करूनच घेतले जातील, असे प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी सांगितले.
अजितदादांकडची खाती कायम ठेवा
अजितदादांकडे अर्थ, क्रीडा आणि उत्पादन शुल्क ही खाती होती. ती सर्व खाती अजित पवार गटाकडे कायम ठेवण्यात यावीत, असा प्रस्ताव मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीसाठी गेलेल्या शिष्टमंडळाने दिला.
अर्थ खाते घेऊन उर्जा खाते देण्याची चर्चा
अजित पवार गटात अर्थखात्याची जबाबदारी समर्थपणे पेलेल असे नाव सध्या मंत्रिमंडळात असणाऱयांत नाही. त्यामुळे अर्थ खाते मुख्यमंत्री फडणवीस स्वतःकडे ठेवण्याची शक्यता आहे. त्या बदल्यात मुख्यमंत्र्यांकडील ऊर्जा व अन्य एखादे खाते देण्याची चर्चा आहे.
आज दुपारी 2 वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक
अजित पवार गटाचा विधिमंडळ गटनेता निवडण्यासाठी शनिवारी दुपारी 2 वाजता विधान भवनात बैठक होणार आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून एकमताने निवड केली जाईल. त्याबाबतचे पत्र मुख्यमंत्री फडणवीस यांना सादर केले जाईल.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक
अजित पवारांच्या अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादीच्या इतर पाच बड्या नेत्यांची बैठक झाली. पक्षाकडून होत असलेल्या आग्रहामुळे सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास होकार दिला. यावेळी अजितदादांच्या जाहिरातीचे काम पाहणाऱ्या डिझाईन बॉक्स कंपनीचे प्रमुख नरेश अरोरा उपस्थित होते.
त्यांच्या निर्णयाला आमचा पाठिंबा – फडणवीस
जो काही निर्णय घ्यायचा तो अजित पवार गटाने घ्यायचा आहे. त्यांचा पक्ष किंवा अजितदादा कुटुंब जो काही निर्णय घेतील त्याला सरकार म्हणून आमचा पाठिंबा राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यांच्या पक्षाच्या नेत्यांसोबत माझी दोन वेळा चर्चा झाली आहे. त्यांच्या पक्षाकडे जे काही ऑप्शन असतील त्याबाबत चर्चा करून ते सांगतील.































































