
हिंदुस्थानी फुटबॉलसाठी एक प्रेरणादायी क्षण उजाडला आहे. सीएएफएमध्ये (मध्य आशियाई फुटबॉल संघटना) तिसऱया स्थानावर यशस्वी कामगिरी केल्यानंतर राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक खालिद जमील यांनी 30 सदस्यांचा संभाव्य संघ जाहीर केला आहे. या यादीत सर्वांच्या नजरा खेचणारे नाव म्हणजेच हिंदुस्थानी फुटबॉलचा आधारस्तंभ, स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्री.
छेत्रीला मागील स्पर्धेत विश्रांती देण्यात आली होती, मात्र आगामी एएफसी आशियाई कप पात्रता फेरीच्या (सिंगापूरविरुद्ध) सामन्यांसाठी त्याचे पुनरागमन म्हणजे एका खेळाडूचे परतणे नसून हिंदुस्थानी फुटबॉलसंघासाठी नवा आत्मविश्वास आणि जिंकण्याची जिद्द घेऊन आल्याची घटना आहे.
या आगामी स्पर्धेसाठी संघाचे सराव शिबीर 20 सप्टेंबरपासून बंगळुरू येथे सुरू होईल. या शिबिरासाठी 19 खेळाडू एकत्र येतील. त्यानंतर 9 ऑक्टोबरला सिंगापूर नॅशनल स्टेडियम येथे आणि 14 ऑक्टोबरला मडगावच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे सिंगापूरविरुद्ध लढत रंगेल. मोहन बागान एसजी आणि एफसी गोवा यांचे खेळाडू त्यांच्या एएफसी चॅम्पियन्स लीग-2 चे सामने पूर्ण केल्यानंतर संघात सहभागी होणार आहेत. याशिवाय पाच खेळाडूंना राखीव खेळाडूंच्या यादीत ठेवण्यात आले आहे. ज्यांची नावे लवकरच जाहीर केली जातील.
हिंदुस्थानी संघाची संभाव्य यादी
- गोलरक्षक ः अमरिंदर सिंह, गुरमीत सिंह, गुरप्रीत सिंह संधू
- बचावफळी ः अन्वर अली, बिकाश यमनम, चिंगलेनसाना सिंह कोनशम, हमिंगथानमविया राल्टे, मुहम्मद उवेस, प्रमवीर, राहुल भेके, रिकी मीताई हाओबाम, रोशन सिंह नाओरेम
- मध्यरक्षक ः आशिक कुरुनियन, दानिश फारुक भट, जिक्सन सिंह थौनाओजाम, जितिन एमएस, मॅकार्टन लुईस निक्सन, महेश सिंह नाओरेम, मोहम्मद एमेन, निखिल प्रभू, सुरेश सिंह वांगजाम, विबिन मोहनन
- आक्रमक ः इरफान यादवद, लालियानझुआला छांगटे, मनवीर सिंह (ज्युनियर), मोहम्मद सनान के, मुहम्मद सुहैल, पार्थिब गोगोई, सुनील छेत्री, विक्रम परताप सिंह n मुख्य प्रशिक्षक ः खालिद जमील


























































