धोपावकरी शब्दसाज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. गजानन शेपाळ

स्मार्ट दिसणं किंवा सुंदर दिसणं आणि सुंदर असणं यात जो फरक आहे तो सुनील धोपावकर यांच्या अक्षररचनांद्वारे दिसतो. धोपावकरी संस्कारांतून बनलेली अक्षरे आणि अक्षरसमूहांतून बनलेले शब्द यांचं सौंदर्य सुनील यांनी शोधलं आहे. मराठीतील तब्बल 70 फॉण्ट डिझाईन्स बनवून त्यांनी जो ‘धोपावकरी’ शब्दसाज चढवला आहे ती ‘अक्षराधना’च (अक्षरांची आराधना) म्हणावी लागेल.

मराठी भाषा 16 स्वर आणि 36 व्यंजने अशा एकूण 52 अक्षरांनी बनलेली! 2011च्या जनगणनेनुसार हिंदुस्थानातील बोलीभाषांपैकी मराठी भाषा ही तिसऱया क्रमांकाची भाषा आहे. दहा कोटींहून अधिक लोक मराठी बोलतात असं लेखी नमूद असलं तरी प्रत्यक्षात हा आकडा वाढणाराच आहे. अहिराणी, खान्देशी, कोंकणी, मालवणी, तंजोर मराठी, देशावरील, पहाडी/ डोंगरी अशा विविध बोलींमध्ये मराठी भाषा बोलली जाते. आपल्याकडे तर मैलावर भाषा, बोलीभाषा बदलते. ते सत्यही आहे. हे सारं सांगण्याचा उद्देश एवढाच की, सुनील धोपावकर या प्रथितयश ‘अक्षररचनाकार’ कलावंताने सुमारे 42 वर्षे तब्बल 70 फॉण्ट डिझाइन्स बनवून मराठी भाषेची जी ‘अक्षराधना’ केली आहे त्यातून निर्माण झालेल्या कलाकृतींचे प्रदर्शन 8 ते 11 फेब्रुवारीदरम्यान लोकमान्य सेवासंघ, राममंदिर रोड, विलेपार्ले (पूर्व) येथे होत आहे.

स्मार्ट दिसणं किंवा सुंदर दिसणं आणि सुंदर असणं यात जो फरक आहे तो सुनील धोपावकर यांच्या अक्षररचनांद्वारे दिसतो. धोपावकरी संस्कारांतून बनलेली अक्षरे आणि अक्षरसमूहांतून बनलेले शब्द यांचं सौंदर्य सुनील यांनी शोधलं आहे. त्यात त्यांची साधना, त्यांचं कौशल्य आणि आशयगर्भता प्राप्त होईपर्यंत त्यांनी घेतलेली मेहनत अशा त्रिवेणी संगमातून शब्दवैभव साकारलेलं आहे. गुबगुबीत हा शब्द गुबगुबीतच भासतो दिसतो. त्यातील अक्षरे ही अशक्त दिसत नाहीत. ती गोलमटोलच दिसतात. कात्री, पतंग अशी अनेक विशेषतः असलेली शब्दांची रास धोपावकरी संस्कारांनी सुंदर बनलेली आहेत. अक्षरांच्या आधी चित्रलिपी होती. एका चित्रात हजार शब्दांचे महत्त्व असते असा आपला चित्रलिपी ते अक्षरलिपी असा प्रवास झाला आहे. धोपावकरांनी या प्रवासाचा अभ्यास करून पुनश्च वेगळय़ा स्वरूपात चिंतन केलेलं आहे. त्यांचा या क्षेत्रातील प्रवास हा थोडा हटके आहे. त्यांनी अक्षरांना आशयगर्भता आणून जे जे शब्द प्रचारात आहेत त्यांना आकारबद्ध करण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे. त्यामागे त्यांची तळमळ दिसते. मराठी भाषा संवर्धन आणि मराठी भाषेचं सौंदर्य जगासमोर मांडण्यासाठी ते गेली 42 वर्षे कार्यरत आहेत.

सुनील धोपावकरांसारखे अनेक आयकॉन्स या चित्र-शिल्प व उपयोजित कला क्षेत्रात पैसे कमावण्याच्या उद्देशाने नव्हे तर संस्कृती,परंपरा, आदर्श रूढी जपण्याच्या उद्देशाने काम करीत आहेत. अर्थात त्यासाठी लागणाऱया आर्थिक पाठबळाचा प्रश्न उरतोच. तरीही ते अर्धे शतक मराठी भाषेचे सौंदर्य वाढविण्यात व्यस्त आहेत. अशा प्रामाणिक, प्रसिद्धीच्या झोतात नसलेल्या कलाकारांना ‘पद्म’ पुरस्कार मिळायला हवेत. सर विल्यम जोन्स म्हणतात, ‘‘कोणत्याही लिपीपेक्षा ‘देवनागरी’ ही अधिक वैज्ञानिक आणि पद्धतशीर लिपी आहे.’’ जॉन ख्रिस्त म्हणतात, ‘‘देवनागरी ही मानवी मेंदूतून तयार झालेल्या वर्णमालांपैकी सर्वात संपूर्ण वर्णमाला आहे.’’ आचार्य विनोबा भावे म्हणतात, ‘‘हिंदी भाषा हिंदुस्थानच्या ऐक्यासाठी देईल त्यापेक्षा देवनागरी लिपी जास्त काम देऊ शकेल.’’ मोहनलाल म्हणतात, ‘‘देवनागरी वर्णमाला भाषेच्या शास्त्रात ध्वन्यात्मक अचूकतेचे एक भव्य स्मारक आहे.’’ एकूणच ‘देवनागरी’ लिपी ही अभ्यासक्रमांची लिपी आहे. या लिपीत बऱयाच हिंदुस्थानी भाषा आणि बऱयाच परदेशी भाषा लिहिल्या जातात. संस्कृत, पाली, हिंदी, कोंकणी, सिंधी, कश्मिरी, हरियाणवी, डोंगरी, नेपाळी, गडवली, बोडो, अंगिका मराही, भोजपुरी, नागपुरी, मैथिली, संथाळी, राजस्थानी, गुजराती, विष्णुपुरीया अशा अनेक भाषा देवनागरीमध्ये लिहिल्या जातात. या देवनागरी ‘स्क्रिप्ट’ची अत्यंत जवळची म्हणजे लगोलग आलेली ‘मराठी’ म्हणूनच समृद्ध, सार्वभौम, सर्वांगपूर्ण, सौंदर्यपूर्ण आणि संपन्न भाषा लिपी आहे.

सुनील धोपावकर यांनी प्रचार व प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात भरपूर कामे एका तळमळीने केली आहेत. शब्दांना अक्षरांमुळे ‘ओळख’ निर्माण होते. एकाहून अनेक शब्द मिळून वाक्य तयार होते. वाक्यांमुळे विचार कळतो, विचारांमुळे स्वभाव कळायला मदत होते आणि स्वभाव हा ‘प्रकृती’शी संबंधित असतो. हे झालं साधंसरळ समीकरण. हे पूर्ण समजेपर्यंत कदाचित वेळ निघूनही गेलेली असते. धोपावकरांनी या साऱयाला ‘बायपास’ मार्ग शोधला आणि अक्षरांचे शब्द आशयगर्भ व आकारबद्ध करून त्यांना एका विशिष्ट ‘स्वभावात’, ‘प्रकृती’त बसविण्याचा भगीरथ प्रयत्न केला आहे. ‘स्टार्टअप’, ‘बुडबुडे’, ‘काँक्रीट’, ‘डोळे’, ‘चित्रकार’, ‘बुद्धिबळ’, ‘कैची’, ‘इंजेक्शन’, ‘व्यसने’, ‘गणपती’, ‘नळ’, ‘तांडव’, ‘उंच’, ‘करंट’, ‘बिजली’, ‘डोळे’, ‘नो एण्ट्री’, ‘बेडूक’ अशा अनेक शब्दांना त्यांच्या मूळ आशयाजवळ नेऊन चिरंतन सौंदर्यात व्यक्त करण्याचे अद्भुत काम त्यांनी केले आहे.

[email protected]