खेळालाच रोजगार बनविण्याची संस्कृती देशात रुजवायला हवी- सुनील गावसकर 

554

देशात खेळाला स्वस्त बनवून खेळातच रोजगार शोधण्याची संस्कृती देशात रुजवणे गरजेचे आहे. आपल्या देशाची प्रचंड लोकसंख्या क्रीडा क्षेत्रासाठी वरदान ठरू शकतो.कारण एवढ्या मोठ्या लोकसंख्येतून “चॅम्पियन” शोधणे कठीण नाही ,असा स्टेट ड्राइव्ह लगावत हिंदुस्थानचे माजी कर्णधार “लिटल मास्टर” सुनील गावसकर यांनी शालेय स्तरापासूनच खेळ हा विषय सक्तीचा करण्याची मौलिक सूचना मांडली आहे. बंगुळुरूतील “मेकिंग ‘मेकिंग स्पोर्ट्स इन इंडिया’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

विदेशात खेळालाच करिअर बनविण्याच्या संधींचा तेथील युवक मोठ्या संख्येने लाभ घेतात.सरकारही क्रीडापटूंना भरभरून सवलती देते.त्याच धर्तीवर हिंदुस्थानातही खेळ हा विषय शैक्षणिक अभ्यासक्रमात सक्तीचा करायला हवा आणि खेळाची आवड विद्यार्थी वर्गात वाढवण्यासाठी आपण सर्वानीच प्रामाणिक प्रयत्न करायला हवेत ,असे प्रतिपादन क्रिकेट लिजेंड म्हणून ओळखले जाणारे सुनील गावसकर यांनी केले.जे विद्यार्थी खेळांत प्राविण्य दाखवतात त्यांना विशेष सवलतीसोबत पाठ्यवेतनही भत्त्यांच्या रूपात द्यायला हवे.खेळात आपल्या पाल्यांना करिअर करता येते याची जाण आल्यावर पालकही आपल्या मुलांना मोठ्या संख्येने खेळासाठी प्रोत्साहित करतील असेही गावसकर म्हणाले.

क्रिकेटला करिअरचा पर्याय मानल्यानेच हा खेळ देशात सर्वात जास्त वाढला
क्रिकेट हा देशाचा सर्वात लोकप्रिय खेळ ठरलाय ,कारण या खेळाला आपले करिअर बनविणे युवकांना पटले आहे.क्रिकेटमध्ये पुढे येण्यासाठी तुम्हाला आयपीएल अथवा आंतरराष्ट्रीय लढतीच खेळायला हवे असे नाहीय.तुम्ही रणजी क्रिकेट खेळलात तरी एखाद्या कॉर्पोरेट कंपनी अथवा सरकारी नोकरीपेक्षा जास्त कमावू शकता हे वास्तव आहे. त्यामुळेच देशात क्रिकेट अधिक वाढला.एक क्रीडापटू म्हणून अन्य खेळांनीही हिंदुस्थानात अशीच लोकप्रियता मिळवली तर क्रीडा क्षेत्रातील महासत्ता बनवण्याचे आपले स्वप्न निश्चित पूर्ण होईल असेही प्रतिपादन गावसकर यांनी शेवटी केले.

देशात क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सरकार आणि जनता यांनी एकदिलाने काम केल्यास क्रीडा क्षेत्र आपल्या नागरिकांना चांगले आरोग्य राखण्यास मदत करील, शिवाय देशाला मोठा आर्थिक लाभ होऊन गौरवाचे क्षणही अनुभवता येतील. खेळ हा केवळ पदकासाठी खेळायचा नाही ही भावना देशातील युवकांत रुजायला हवी – अपर्णा पोपट, आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू

आपली प्रतिक्रिया द्या