सुनील खोत हेच शिरोळमधील ‘वंचित’चे उमेदवार, तालुका कार्यकारिणी बरखास्त

690

शिरोळ विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुनील खोत हे आगेकूच करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत काही मंडळींनी संभ्रम निर्माण करण्यासाठी दुसर्‍या उमेदवाराला पाठिंबा देण्याची खेळी केली आहे. दुसर्‍याला पाठिंबा देणार्‍या असलम मुल्ला यांना लोकसभा निवडणुकीपूर्वीच जिल्हाध्यक्षपदावरून मुक्त केले असून आता शिरोळ तालुका कार्यकारिणीही बरखास्त करीत असल्याची घोषणा आघाडीचे राज्यसंघटक संग्राम सावंत व राज्य महासचिव सचिन माळी यांनी पत्रकार बैठकीत केली.

संग्राम सावंत म्हणाले, दोन दिवसांपूर्वी सुनील खोत यांच्याऐवजी अन्य उमेदवाराला वंचित बहुजन आघाडी पाठिंबा देत असल्याची घोषणा तालुकाध्यक्षांसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली होती. मात्र, जिल्हाध्यक्षांना फार पूर्वीच पदावरून मुक्त करण्यात आले आहे. आजपासून शिरोळ तालुका कार्यकारिणीही बरखास्त करीत आहोत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने दुसर्‍या कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा दिल्याचे सिद्ध होत नाही.

कार्यकर्त्यांनी व मतदारांनी कोणत्याही खोट्या प्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले. ज्यांनी दुसर्‍या उमेदवाराला पाठिंबा दिला, त्यांच्याबाबत आर्थिक व्यवहार झाल्याची शंका आहे. प्रबुद्ध भारतच्या अंकात सुनील खोत यांच्याऐवजी दुसर्‍याला उमेदवारी दिल्याचे प्रसिद्ध झालेले वृत्त खरे आहे. मात्र, कोणत्या तांत्रिक कारणांनी ही उमेदवारी सुनील खोत यांना दिली, याचे स्पष्टीकरण स्वतः आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर करतील.

आपली प्रतिक्रिया द्या