
कॉमेडियन सुनील पालच्या अपहरणप्रकरणी मेरठ पोलिसांनी अर्जुन कर्णपाल याला अटक केली आहे, पण रविवारी सकाळी अर्जुनने पोलिसांच्या तावडीतून निसटण्याचा प्रयत्न केला. त्याला मेरठच्या लाल कुर्ती पोलीस स्टेशनमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना अर्जुनने अचानक एका सबइन्सपेक्टरचे पिस्तूल हिसकावून पोलिसांच्या ताब्यातून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करताच आरोपीने गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपी अर्जुनच्या पायाला गोळी लागल्याने तो जखमी झाला.
आरोपीला जखमी अवस्थेत अटक करण्यात आली. त्यानंतर उपचारासाठी मेरठच्या जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. सुनील पाल अपहरण प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. आरोपी अर्जुनकडून अपहरणासाठी वापरलेली स्कॉर्पियो, सवा लाख रुपये आणि एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. बिजनौर येथील टोळीने ही घटना घडवून आणली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱयाने दिली.