मराठमोळा सुनित जाधवच भारत श्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । चेन्नई

मराठमोळ्या सुनित जाधवच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. मुंबईच्या या स्टार खेळाडूने चेन्नईत झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत आपणच किंग असल्याचे दाखवून देत चॅम्पियन होण्याचा मान संपादन केला. गतवर्षी रामनिवासकडून झालेल्या पराभवाचा बदला घेत त्याने चार वर्षांमध्ये तिसर्‍यांदा ही मानाची स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला.  

अनिल बिलावानेही इतिहास रचला

सुनित जाधव पाठोपाठ मुंबईकर अनिल बिलावानेही सर्वांचे लक्ष वेधले. चार महिन्यांपूर्वी शरीरसौष्ठवाच्या मंचावर पदार्पण करणार्‍या महाराष्ट्राच्या अनिल बिलावाने इतिहास रचला. त्याने आपल्या पहिल्याच स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकण्याचा पराक्रम केला. ही त्याची अवघी चौथीच स्पर्धा होती. तो सर्वप्रथम नवोदित मुंबई श्रीमध्ये उतरला आणि जिंकला. मग त्याने मुंबई श्री जिंकण्याचा भीमपराक्रम केला.  

महाराष्ट्र प्रथमच सांघिक विजेता

महाराष्ट्र सांघिक विजेता ठरणार हे सुनित जाधवचे भाकीत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खरं करून दाखवलं. आजवर भारत श्रीवर नेहमीच रेल्वे आणि सेना दलाचे वर्चस्व असायचे, पण यावेळी 65 किलो वजनी गटात दिनेश कांबळे, 75 किलो वजनी गटात अनिल बिलावा आणि 90 किलो वजनी गटात सुनितने बाजी मारल्यामुळे महाराष्ट्राने संयुक्तपणे 70 गुणांनिशी रेल्वेसह सांघिक विजेतेपदही पटकावले. महाराष्ट्राने प्रथमच सांघिक जेतेपद जिंकण्याची किमया साधली.