आज सुपर एटची लढाई; अपराजित हिंदुस्थान-अमेरिका आमने-सामने

जगज्जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेला हिंदुस्थान आणि पदार्पणातच क्रिकेट जगताची मने जिंकणारा यजमान अमेरिका हे टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपमधील ‘अ’ गटातील अजेय संघ न्यूयॉर्कच्या धोकादायक खेळपट्टीवर भिडणार आहेत. या लढतीत कोण कोणाचा विजयरथ रोखणार याकडे तमाम क्रिकेटशौकिनांच्या नजरा असतील. कागदावर हिंदुस्थानी संघ नक्कीच वरचढ वाटत असला तरी ते अमेरिकेला कमी लेखण्याची चूक करणार नाहीत. ही सुपर एटची लढतसुद्धा आहे, जो जिंकेल तो थेट सुपर एटमध्ये धडक मारणारा पहिला संघ ठरेल.

अमेरिकेचा संघ जबरदस्त फॉर्मात खेळतोय. टी-20 वर्ल्ड कपच्या आधी त्यांनी बांगलादेशला टी-20 मालिकेत 2-1 फरकाने लोळविले. टी-20 वर्ल्ड कपच्या उद्घाटनाच्या लढतीत त्यांनी पॅनडाकडून मिळालेले 195 धावांचे लक्ष्य 17.4 षटकांतच पूर्ण केले. त्यानंतर पाकिस्तानकडून मिळालेल्या 159 धावांच्या लक्ष्याची बरोबरी करून सुपर ओव्हरमध्ये बाजी मारली. त्यामुळे कमालीचे मनोधैर्य उंचावलेला अमेरिकन संघ टीम इंडियाविरुद्धही सर्वस्व झोकून खेळताना दिसेल.

दुसरीकडे आयपीएल खेळून वर्ल्ड कपच्या स्वारीवर गेलेल्या टीम इंडियातील सर्वच खेळाडू लयीमध्ये आहेत. वर्ल्ड कपपूर्वीच्या सराव सामन्यात बांगलादेशला हरविल्यानंतर प्रत्यक्ष वर्ल्ड कपमध्ये आयर्लंड व पाकिस्तान यांना हरविले. हिंदुस्थानच्या धारधार गोलंदाजीचा आता इतर प्रतिस्पर्धी संघांनीही धसका घेतला असेल, मात्र टीम इंडियाने अद्यापि आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी केलेली नाहीये. जगज्जेतेपदाचे स्वप्न पुन्हा एकदा सत्यात उतरविण्यासाठी हिंदुस्थानी संघाला फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण अशा सर्वच आघाडयांवर सरस खेळ करावा लागणार आहे. हार्दिक पंडय़ा, रवींद्र जाडेजा व अक्षर पटेल हे अष्टपैलू त्रिकूट हिंदुस्थानसाठी बोनस आहेत. कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली, सूर्यकुमार यादव व ऋषभ पंत अशी क्रिकेटविश्वातील सर्वोत्तम आघाडीची फळी हिंदुस्थानच्या दिमतीला असल्याने अमेरिकन गोलंदाजांची आता खरी परीक्षा असेल.

अमेरिका बनलाय धोकादायक संघ
टी-20 वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत झालेल्या दोन्ही लढतींत अमेरिकेच्या फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी चांगली कामगिरी केलेली आहे. कर्णधार मोनांक पटेलसह एरोन जोन्स व अॅण्ड्रय़ू गोस असे मॅचविनर फलंदाज अमेरिकेच्या दिमतीला आहेत. गोलंदाजीमध्ये मुंबईकर सौरभ नेत्रावळकर व नॉस्थुश किजिंगे यांच्यावर यजमान संघाची मदार असेल.

संजू सॅमसनला संधी?
हिंदुस्थानी संघात अमेरिकेविरुद्धच्या लढतीत एक बदल अपेक्षित आहे. शिवम दुबेऐवजी संजू सॅमसन किंवा यशस्वी जैसवाल यांना संधी मिळू शकते. पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत दुबे फलंदाजीत, तर अपयशी ठरलाच, पण गाफीलपणामुळे त्याने एक सोपा झेलही सोडला होता. त्यामुळे आयपीएल गाजविणारा यष्टिरक्षक फलंदाज संजूला त्याच्या जागेवर संधी मिळण्याची शक्यता आहे.

हिंदुस्थान – रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पंडय़ा, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, अर्शदीप सिंह, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज.

अमेरिका – मोनांक पटेल (कर्णधार), एरॉन जॉन्स, अॅण्ड्रय़ू गोस, कोरी अॅण्डरसन, अली खान, हरमीत सिंह, जस्सी सिंह, मिलिंद कुमार, निसर्ग पटेल, नितीश कुमार, नॉस्थुश किजिंगे, सौरभ नेत्रावळकर, शॅडली वान शॅलवीक, स्टीवन टेलर, शायन जहांगीर.