
पतीने आपल्या पत्नीला घरखर्चाचा हिशोब ठेवायला सांगणे म्हणजे क्रूरता ठरत नाही, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केली. पत्नीने पतीविरोधात दाखल केलेली याचिकासुद्धा सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली.
न्यायाधीश बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायाधीश आर. महादेवन यांच्या खंडपीठाने यावर सुनावणी करताना म्हटले की, एखाद्या पुरुषाने त्याच्या पत्नीला घरातील सर्व झालेल्या खर्चाचा हिशोब ठेवण्यासाठी अॅक्सेल शीट बनवायला लावणे म्हणजे पतीने पत्नीविरोधात क्रूरता केली आहे, असे मानले जाऊ शकत नाही. बरेज पुरुष आर्थिक कारणांवरून पत्नीवर वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु पतीच्या आर्थिक वर्चस्वाचा पत्नीचा आरोप क्रूरता असू शकत नाही. तसेच हे फौजदारी कारवाई करण्याइतपत ठोस कारण असूच शकत नाही, असे कोर्टाने नमूद केले. वैवाहिक आयुष्य जगताना पती आणि पत्नीमध्ये अनेकदा खटके उडत असतात. म्हणून त्याला क्रूरता म्हणता येत नाही, असेही कोर्टाने म्हटले.

























































