
लाल किल्ल्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख आरोपी आणि सूत्रधार असलेला लश्कर-ए-तोयबाचा दहशतवादी मोहम्मद अरीफ उर्फ अश्फाक याने फाशीच्या शिक्षेविरोधात सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल केली आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती जेके माहेश्वरी यांच्या विशेष खंडपीठाने अश्फाकच्या याचिकेची दखल घेतली असून केंद्र सरकार, राष्ट्रीय तपास यंत्रणा(एनआयए) व इतर यंत्रणांना नोटीस बजावली आहे.
अपील आणि पुनर्विलोकन या दोन्ही टप्प्यांवर त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आल्याचे आरिफने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. फाशीच्या शिक्षेतून दिलासा मिळवण्यासाठी त्याने आता क्युरेटिव्ह याचिका दाखल करत फाशीच्या शिक्षेबाबत पुनर्विचार करण्याची विनंती न्यायालयाकडे केली आहे. यापूर्वी 3 नोव्हेंबर 2022 रोजी, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात आरिफची पुनर्विलोकन याचिका फेटाळून लावली होती.
2000 सालच्या लाल किल्ला प्रकरणात आरिफ आरोपी आहे. त्याने इतर दहशतवाद्यांसोबत मिळून हल्ला केल्याच्या कटात तो दोषी आढळला होता. याप्रकरणी ऑक्टोबर 2005 मध्ये सत्र न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आरिफने सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल करत आपल्या निकालाचा फेरविचार करण्याची विनंती केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घेत एनआयए आणि केंद्र सरकारकडे सविस्तर उत्तर मागितले आहे.



























































