पुन्हा नवी तारीख; शिवसेनाप्रमुखांच्या शताब्दी जयंती दिवशी होणार शिवसेनेची सुप्रीम कोर्टातील सुनावणी

महाराष्ट्रातील जनतेसह संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी पुन्हा नवी तारीख दिली. सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने शिवसेनेची पुढील सुनावणी शुक्रवारी 23 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता घेणार असल्याचे जाहीर केले. शुक्रवारी 23 जानेवारी, 2026 रोजी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असून या दिवसापासून शिवसेना शताब्दी वर्ष साजरे करणार आहे.

शिंदे गटाने सत्तेच्या हव्यासापोटी मूळ शिवसेनेशी गद्दारी केली. त्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्याऐवजी याच गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला. 2022 मध्ये आयोगाने घेतलेल्या त्या निर्णयाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यांची याचिका मागील तीन वर्षे प्रलंबित आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रकरण वेळीच निकाली निघण्याची अपेक्षा होती. मात्र बुधवारी पुन्हा अपेक्षाभंग झाला.

सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने 23 जानेवारी रोजी सुनावणी घेणार असल्याचे जाहीर केले. शिवसेनेचे प्रकरण बुधवारी कार्यतालिकेत 37 व्या क्रमांकावर सूचीबद्ध करण्यात आले होते. मात्र बुधवारी पुन्हा सुनावणी पुढे ढकलण्यात आली.

आजच्या सुनावणीत नेमके काय घडले?

सर्वोच्च न्यायालयात बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे उपस्थित होते. त्यांनी आपल्याला दुसऱ्या प्रकरणात हजेरी लावण्यासाठी जायचे असल्याचे सांगून युक्तिवाद करण्यासाठी वेळ मागितला. तसेच सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या खंडपीठापुढे निवडणुकांशी संबंधित एसआयआर प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेची सुनावणी पुढे ढकलण्याबाबत सर्वांची सहमती आहे का, अशी विचारणा सरन्यायाधीशांनी सर्व पक्षकारांना केली. त्यावर सर्व पक्षकारांच्या वकिलांनी सहमती दिल्याने सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाची सुनावणी येत्या शुक्रवारी सकाळी 11 वाजता घेणार असल्याचे निश्चित केले. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि घड्याळ निवडणूक चिन्हाचे प्रकरण देखील सुनावणीसाठी घेतले जाणार आहे. त्यामुळे शुक्रवारची सुनावणी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

बंडखोर शिंदे गटाने शिवसेना पक्ष, धनुष्यबाण चिन्हाचा वापर करुन लोकसभा, विधानसभा निवडणूका लढवल्या. त्यापाठोपाठ नुकत्याच झालेल्या नगरपरिषद, महापालिका निवडणुकांमध्येही शिवसेना, धनुष्यबाणाचा वापर केला आहे. आता राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका 5 फेब्रुवारीला होणार आहे. त्यापूर्वी या प्रकरणात न्यायालय अंतिम निर्णय देणार का, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.